जिल्हा
महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरांना २४ तासात अटक
महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरांना २४ तासात अटक
फोटो: ठाणे वैभव
भाईंदर: सकाळच्या वेळेस मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील सुमारे अडीच लाखांची सोनसाखळी हिसकावून पसार झालेल्या दोघा चेन स्नॅचर्सना केवळ २४ तासांत गजाआड करण्याची कामगिरी गुन्हे शाखा कक्ष १, काशिमीरा पथकाने केली आहे. घटनेवेळी चोरट्यांनी महिलेला धक्का देऊन जखमी केले होते.
११ एप्रिल रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. आर. एल. कॉलेजच्या मागील सार्वजनिक रस्त्यावर सालासार अवतार बिल्डिंग जवळ फिर्यादी महिला मॉर्निंग वॉक करत असताना, मोटारसायकलवर आलेल्या दोन अनोळखी इसमांनी तिच्या गळ्यातील चार तोळे वजनाची, अंदाजे २.५० लाख रुपये किंमतीची सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावली. धक्का दिल्यामुळे महिलेच्या डाव्या हाताला आणि पायाला जखमही झाली.
याप्रकरणी मिरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.या घटनेची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा कक्ष १, काशिमीरा यांनी समांतर तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण करण्यात आले. तसेच स्थानिक पातळीवरील गोपनीय माहितीच्या आधारे दोन संशयितांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले. तपासात आरोपींची नावे निरज रामू राजनट (२५, रा. लक्ष्मी पार्क, मिरारोड पूर्व) आणि सुनिल संजय राज (२२, रा. रामदेव पार्क, मिरारोड पूर्व) अशी असून, त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. दोघांनाही अटक करून पुढील तपासासाठी मिरारोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600