जिल्हा
पलावा पुलाचे काम निकृष्ठ दर्जाचे
पलावा पुलाचे काम निकृष्ठ दर्जाचे
फोटो: ठाणे वैभव
मनसे नेते राजू पाटील यांचा आरोप
कल्याण : पलावा पुलामुळे राजकारण चांगलेच तापले असून मनसे नेते माजी आमदार राजू पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका करताना पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे सांगितले. भीतीपोटी पुलाचे घाईत लोकार्पण केले असून सत्ताधारी ठेकेदाराला काही बोलत नाहीत, ते खाल्ल्या मिठाला जागत आहेत. मात्र पुलावर लोकांचे बळी जातील, त्यामुळे पुलाच्या रस्त्याची दुरुस्ती करून मगच पूल सुरु करावा, अशी मागणी श्री. पाटील यांनी केली आहे.
घाईघाईत या पुलाचे लोकार्पण केले, त्यानंतर मोटरसायकलचा अपघात झाला. पूल पुन्हा बंद केला, ग्रीट पावडर टाकून पूल पुन्हा सुरू केला, मात्र पुलाचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. दीडशे कोटींचा पूल सात आठशे कोटीपर्यंत पैसे खाण्यासाठी नेला. पूल चालू करताना आमच्यावर टीका केली, त्यांनी काहीही करायचं आणि जनतेने सहन करायचे हे चुकीचे आहे. मी अशा गोष्टी सहन करणार नाही. त्यांचे मित्रपक्ष सहन करत असतील, मनसे सहन करणार नाही. या पुलाचे साधे गर्डर लॉन्च केले तेव्हा फटाके वाजवले, मात्र या पुलाचे लोकार्पण करताना त्यांनी भीतीमुळे हे काम लवकर आवरले. या पुलावर लोकांचे बळी जाऊ शकतात, त्यामुळे लवकरात लवकर पुलाची देखभाल-दुरुस्ती करावी, अशी मागणी मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी केली आहे.
या पुलाबाबत पोलिसांकडे तक्रार करण्यापेक्षा लाचलुचपत विभागाकडे तक्रार करा, पोलीस फार तर ठेकेदाराला नोटीस देतील. मात्र त्याला काही अर्थ नाही. मोठ्या प्रमाणात एकंदरीतच खूप भ्रष्टाचार झाला आहे. ठेकेदाराचे आणि त्याच्या इतर सेल कंपन्यांची चौकशी करण्यात यावी, तेव्हाच येथील भ्रष्टाचार बाहेर येईल, अशी मागणी राजू पाटील यांनी केली.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600