जिल्हा
विरार-भिवंडी ते अलिबाग महामार्गाचे काम रखडले
विरार-भिवंडी ते अलिबाग महामार्गाचे काम रखडले
फोटो: ठाणे वैभव
* भिवंडीतील शेतकरी हवालदिल
* शासनस्तरावर चालना देण्याची मागणी
भिवंडी: ठाणे जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या व वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र व राज्य शासन स्तरावरून एमएमआरडीएच्या माध्यमातून विरार-भिवंडी ते अलिबाग हा नवीन कॉरिडोर रस्ता महामार्ग तयार करण्याचे काम मंजूर झाले आहे.
हा महामार्ग समृद्धी आणि कोकण एक्स्प्रेस वे ला जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. याकरीता भिवंडी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादन करणे संदर्भात शासन स्तरावरून रहिवासी नागरिकांना व शेतकऱ्यांना नोटिसा बजावण्यात आले आहेत. मात्र या मार्गाच्या कामाबाबत व व्यवहाराबाबत शासनाकडून गेल्या काही महिन्यापासून कोणत्याही हालचाली न झाल्याने येथील शेतकरी उपविभागीय अधिकारी कार्यालयात हवालदिल झाले असून शासन स्तरावर या योजनेला चालना देण्याची मागणी होत आहे.
विरार-भिवंडी ते अलिबाग हा 'मल्टी मॉडेल कॉरिडोर' महामार्ग १२६ किमी अंतराचा असून हा महामार्ग रस्ता सुमारे सहा ते चौदा पदरी असून रायगड, ठाणे व पालघर अशा तीन जिल्ह्यांना जोडणारा प्रमुख महामार्ग असणार आहे. विरार-भिवंडी-अलिबाग हा 'मल्टी मॉडेल कॉरिडोर' महामार्ग भिवंडी तालुक्यातील अलीमघर, हायवे दिवा, काल्हेर, कशेळी, केवणी दिवा, खारबाव, खर्डी अशा विविध गावातून जात असल्याने या महामार्गाचा रस्ता तयार करण्यासाठी शासन स्तरावरून या गावातील रहिवासी नागरिक व शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी करून भुसंपादन करण्याबाबत नोटिसा देण्यात आले आहेत. मात्र बाधित शेतकऱ्यांना याबाबत कोणत्याही प्रकारचा मोबदला अद्याप देण्यात आलेला नाही तसेच रस्ते कामा संदर्भात कोणत्याही माहिती देण्यात आलेली नाही.
दरम्यान या महामार्गाचे काम सुद्धा ठप्प आहे. त्यातच आता या महामार्गात बदल होण्याची चर्चा नागरिकात होत असल्याने हा महामार्ग होणार की नाही याबाबत शेतकऱ्यांनी शंका सुद्धा उपस्थित केल्या आहेत. याची खात्री करण्यासाठी आणि व्यवहारात पूर्वीसारखे काही घोटाळे होऊ नये म्हणून बाधित शेतकरी वर्ग गेल्या काही महिन्यापासून प्रत कार्यालयात खेटा घालीत आहेत.
मुंबई महानगरातील प्रवेश नियंत्रित असा हा पहिलाच महामार्ग असणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांच्या विकासात विरार- अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉर मोलाचा ठरणार आहे. या कॉरीडोअरमध्ये आठ इंटरचेंज, २८ वाहन अंडरपास, १६ पादचारी अंडरपास आणि १२० कल्व्हर्ट असतील. संपूर्ण मार्ग आठ पदरी असून त्यासाठी २१ उड्डाणपूल, पाच टनेल, ४० मोठे आणि ३२ छोटे पूल प्रस्तावित आहेत. हा मार्ग पूर्ण झाल्यावर परिसरातील ग्रोथ सेंटर, एमआयडीसी आणि वसई-विरार, ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, नवी मुंबई, उरण-पनवेल या महानगरांसह जवाहरलाल नेहरू पोर्ट, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास त्याचा मोठा लाभ होणार असून येथील प्रवासी आणि अवजड वाहतूक वेगवान होण्यास मदत होणार आहे. या मार्गामधोमध १३६ किमी लांबीची मेट्रो मार्गिका उभारण्याचेही प्रस्तावित आहे.
विरार-अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉर एमएमआरडीएकडून एमएसआरडीसीकडे सोपविल्याने महामंडळास तो समृद्धी महामार्गासह प्रस्तावित कोकण एक्स्प्रेस वे सह जेएनपीटीला जोडता येणे सोपे झाले आहे.
विरार-अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉर हा समृद्धी आणि कोकण एक्स्प्रेस वे ला जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. याशिवाय मुंबई-अहमदाबाद, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, जेएनपीटी ते मुंबई-गोवा-पुणे यांना जोडणारा एनच-४ बी या महामार्गांना तो जोडण्यात येणार आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600