देश-विदेश
भारत जोडो यात्रेचे 'सपा'ला आमंत्रणच नाही
अखिलेश यादव यांच्या विधानानंतर काँग्रेसचे स्पष्टीकरण
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होण्यास नकार दिला आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशमधील समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनीदेखील आम्हाला या यात्रेचे निमंत्रण अद्याप मिळालेले नाही, असे सांगितले.
अखिलेश यादव यांच्या याच स्पष्टीकरणावर काँग्रेसने आता प्रतिक्रिया दिली आहे. लवकरच आम्ही आमच्या यात्रेचे वेळापत्रक ठरवू आणि त्यानंतर हे वेळापत्रक इंडिया आघाडीतील इतर पक्षांना दिले जाईल, असे जयराम रमेश यांनी सांगितले.
काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी एक्सवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये त्यांनी अखिलेश यादव यांच्या स्पष्टीकरणावर भाष्य केले. “भारत जोडो न्याय यात्रेचे उत्तर प्रदेशमधील वेळापत्रक तयार केले जात आहे. या वेळापत्रकाला येत्या एक ते दोन दिवसांत अंतिम स्वरुप मिळणार आहे. त्यानंतर हे वेळापत्रक इंडिया आघाडीतील घटकपक्षांना दिले जाईल. अखिलेश यादव भारत जोड यात्रेत सहभागी झाल्यास इंडिया आघाडीला अधिक बळ येईल. ही यात्रा १६ फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशमध्ये प्रवेश करणार आहे,” असे जयराम रमेश यांनी सांगितले होते.
भारत जोडो न्याय यात्रेत इंडिया आघाडीतील घटकपक्षांनीही सहभागी व्हावे, असे काँग्रेसकडून आवाहन केले जात आहे. त्यासाठी वेगवेगळ्या नेत्यांना आमंत्रित केले जात आहे. यावरच अखिलेश यादव यांनी प्रतिक्रिया दिली. “अडचण अशी आहे की, अनेक मोठ्या कार्यक्रमांत आम्हाला आमंत्रित केले जात नाही. बोलावण्यात आलेले नसताना आम्ही स्वत:च आमंत्रणासाठी विचारणा करावी का?” असा प्रश्न अखिलेश यादव यांनी उपस्थित केला.
काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा अगोदर पश्चिम बंगालमध्ये गेली होती. त्यानंतर या यात्रेने बिहारमध्ये प्रवेश केला. आता पुन्हा एकदा ही यात्रा पश्चिम बंगालमध्ये गेली आहे. पश्चिम बंगालमध्येही तृणमूल काँग्रेसच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आम्ही आगामी लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवणार असून आमची इंडिया आघाडीशी जागावाटपावर चर्चा सुरू नाही, असे सांगितले आहे.
तृणमूल काँग्रेसच्या या भूमिकेमुळे काँग्रेसची चांगलीच अडचण झाली आहे. या भूमिकेनंतर ममता बॅनर्जींनी आम्ही भारत जोडो न्याय यात्रेतही सहभागी होणार नाही, असे स्पष्ट केले आहे. दरम्यान, बॅनर्जी यांनी आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहोत, असे सांगितले असले तरी तृणमूल काँग्रेस हा अद्याप इंडिया आघाडीचाच भाग आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600