जिल्हा

कल्याण-डोंबिबलीकरांवर कोणताही कर-दरवाढ नाही

कल्याण-डोंबिबलीकरांवर कोणताही कर-दरवाढ नाही
कल्याण-डोंबिबलीकरांवर कोणताही कर-दरवाढ नाही फोटो: ठाणे वैभव
३१८६ कोटींचा अर्थसंकल्प सादर कल्याण: कोणतीही कर दरवाढ नसलेले कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे सन २०२५-२६चे २७४४.९९ कोटी जमा व २१७२.२२ कोटी खर्चाचे सुधारीत अंदाजपत्रक आणि ३१८६.४९ कोटी खर्चाचे आणि रक्कम ३१८६.६० कोटी जमा रक्कमेचे व १०.५१ लक्ष शिल्लक रक्कमेच्या सन २०२६-२७ चे मूळ अंदाजपत्रक महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी महासभेस सादर केले. यावेळी महापौर हर्षाली चौधरी, उप महापौर राहुल दामले, महापालिका सचिव किशोर शेळके, महापालिका मुख्य लेखा परीक्षक सुरेश बनसोडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिग्विजय चव्हाण, परिवहन व्यवस्थापक डॉ. विजयकुमार द्वासे उपस्थित होते. या अंदाजपत्रकात सन २०२६-२७ या वर्षात मालमत्ता करापोटी ६००.०१ कोटी उत्पन्न अपेक्षित असून शासनाकडून जीएसटी अनुदान व मुद्रांक शुल्कापोटी रक्कम ५१०.०३ कोटी अनुदान अपेक्षित आहे. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात पाणीपट्टी वसुलीपोटी रक्कम १०१ कोटी उत्पन्न अपेक्षित असून शासकीय अनुदाने व अंशदाने अंतर्गत शिक्षण वेतन अनुदानासह ११५.०६ कोटी अनुदान अपेक्षित आहे. विशेष अधिनियमाखाली वसुली ५२६.३० कोटी उत्पन्न अपेक्षित असून २८.८५ कोटी संकिर्ण उत्पन्न अपेक्षित आहे. यामध्ये सन २०२६-२७ वर्षाकरीता ८२९.२५ कोटी अनुदान अपेक्षित आहे. सन २०२६-२७ मध्ये १६५४.०८ कोटी रुपये महसुली खर्च अपेक्षित व १५२४.२० कोटी भांडवली खर्च अपेक्षित आहे. महापालिका निधीतून कल्याण (पूर्व) भागातील युटाईप रस्ता व श्री मलंग रोड, चेतना शाळा ते नेवाळी नाका, मांडा टिटवाळा भागातील विविध रस्त्यांची कामे, ठाणगे वाडी येथील रस्ता अशी अनेक रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. मोठा गांव रेल्वे फाटकाच्या ठिकाणी महापालिकेने रेल्वे उड्डाणपुल प्रस्तावित केला आहे. डोंबिवली पूर्व-पश्चिम जोडणारा कोपर उड्डाणपुल वाहतुकीस अपुरा पडत असल्याने, सदर ठिकाणी नविन दोन पदरी अतिरिक्त उड्डाणपुल बांधण्याचे प्रस्तावित आहे. महापालिका क्षेत्रातील मुलभूत सोयीसुविधांचा विकास या योजनेअंतर्गत सावित्रीबाई फुले कलामंदिराचे अ‍धुनिकीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. याच योजनेच्या अंतर्गत कल्याण पश्चिम भागात आगरी, कोळी, कुणबी, वारकरी सांस्कृतिक भवन, बारावे येथील आरक्षित भुखंडावर डॉ.आनंदीबाई जोशी उद्यान, सुभाष मैदान येथील स्टेडियम ही कामे लवकरच सुरु करण्यात येत आहेत. महापालिकेच्या फंडातून आधारवाडी, लालचौकी, कल्याण (पश्चिम), बैलबाजार कल्याण (पश्चिम), मुरबाड रोड कल्याण (पश्चिम), विठ्ठलवाडी कल्याण (पूर्व), थारवाणी कॉम्प्लेक्स जवळ टिटवाला (पश्चिम), मोक्षधाम स्मशानभुमी डोंबिवली (पूर्व), पाथर्ली डोंबिवली (पूर्व), कोळेगाव डोंबिवली (पूर्व) येथे स्मशानभूमी पुर्ननिर्माणचे काम सुरु करण्यात आले आहे. तर, मुलभूत सुविधाअंतर्गत कॅसारिओ डोंबिवली (पूर्व) व माणेरे येथे स्मशानभूमीचे बांधकाम प्रस्तावित करण्यात आले आहे. महापालिका क्षेत्रातील उद्याने व मैदाने येथे सीसीटिव्ही यंत्रणा बसविण्याचे प्रस्तावित आहे. मौजे बारावे येथे सुसज्ज बगीचा विकसीत करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या उद्यानात ऑटीझम व्हिलेज संकल्पना राबविण्यात आली आहे. तसेच मनपा क्षेत्रात 15 लहान उद्याने, कल्याण (प.) परिसरात, डॉ.आनंदीबाई जोशी उद्यान व भोपर टेकडी सुशोभिकरण प्रस्तावित आहे. अमृत ग्रीन स्पेस अंतर्गत प्रोत्साहनपर अनुदानातून 2 वृक्ष छाटणी वाहने खरेदी करणे व ग्रीन वेस्ट प्रोसेसिंग युनिट उभारणे प्रस्तावित आहे. पाथर्ली येथील जलकुंभाची पुर्नबांधणी करुन दोन द.ल.लि. क्षमतेचा नवीन जलकुंभ उभारणे प्रस्तावित आहेत. अृमत 3.0 योजनेअंतर्गत मनपातील 27 गाव व डोंबिवली पश्चिमसाठी 275 द.ल.ली. क्षमतेचे जलशुध्दीकरणे केंद्र बांधणे, विविध ठिकाणी जलकुंभ व संपपंपगृह बांधणे, वितरण व्यवस्था मजबुतीकरण करणे व मलनि:सारण वाहिन्या टाकणे व इतर अनुषंगीक कामे करण्यात येणार आहेत. भटक्या श्वानांकरीता बैल बाजार येथील श्वान निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केंद्राचे श्रेणीवर्धन करण्यात येत असून, डोंबिवली क्षेत्रामध्ये नवीन श्वान निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केंद्र सुरु करण्याचे प्रस्तावित आहे. डोंबिवली येथे भटक्या श्वानांसाठी निवारा केंद्र उभारण्याचे प्रस्तावित आहे. घनकचरा व्यवस्थापन करीता प्रक्रिया क्षमता वाढविणेकरीता आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत नवीन प्रकल्प प्रस्तावित आहेत. यामध्ये उंबर्डे येथे एमएमआरडीए मार्फत 750 टीपीडी क्षमतेचा क‍चऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प उभारणे, बारावे येथील आरक्षित भूखंड क्र.151 येथे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. यांच्या मार्फत 200 टीपीडी क्षमतेचा बायो सीएनजी प्रकल्प उभारणे, कल्याण पश्चिम बारावे येथील 35 टीपीडी बायो सीएनजी प्लँटचे पुनर्वसन करुन 60 टीपीडी करणे, हॉर्टीकल्चर वेस्ट करीता बारावे येथे ब्रिकेटींग प्लॅन्ट उभारणे, मृत प्राण्यांची विल्हेवाट लावण्याकरीता प्लँन्ट उभारणे आदी प्रस्तावित आहे. खुल्या बाजारातून भांडवल उभारणी अंतर्गत महापालिकेचे विशेष महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करणेकरीता रु.200 कोटीचे कर्ज रोखे उभारणी करणे प्रस्तावित असून, त्यातून प्राप्त होणाऱ्या रक्कमेतून निधी उभारुन प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहेत. विकास प्रस्तावांच्या माध्यमातून विकास शुल्क, व इतर माध्यमातून एकुण रु.241 कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त करण्याचे महापालिकेचे उद्दीष्ट असून, स्मार्ट पार्किंग व जाहिरातीच्या निविदांद्वारे अंदाजे 20 ते 25 कोटी वार्षिक उत्पन्न अपेक्षित आहे. तसेच मालमत्ता विभागातून महापालिकेच्या बांधीव मिळकतींचे भाडे जाहिराती व अन्य उत्पन्नाद्वारे रु.48 कोटी महसुल अपेक्षित धरण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600