जिल्हा
हजारो बाधित रहिवासी रेंटल इमारतींमधूनही बेघर होणार
हजारो बाधित रहिवासी रेंटल इमारतींमधूनही बेघर होणार
फोटो: ठाणे वैभव
रहिवाशांना महापालिकेच्या नोटीसा
ठाणे: रस्ता रुंदीकरण, धोकादायक इमारती आदी ठिकाणी बाधित झालेल्या आणि रेंटल इमारतींमध्ये तात्पुरते पुनर्वसन केलेल्या रहिवाशांना महापालिकेने घरे खाली करण्याच्या नोटीसा बजावल्याने हजारो रहिवाशांवर बेघर होण्याची पाळी आली आहे.
२०१५ पासून ठाणे महानगरपालिका प्रशासनाने धोकादायक इमारतींमध्ये राहणारे नागरिक, झोपडपट्टीधारक, रस्ते रुंदीकरण आणि नाल्यांलगत राहणाऱ्या कुटुंबांचे पुनर्वसन होईपर्यंत त्यांना तात्पुरत्या निवाऱ्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्या रेंटल हाऊसिंग प्रकल्पांमध्ये स्थलांतरित केले. या योजनेअंतर्गत हजारो कुटुंबांना सुरक्षित निवास उपलब्ध करून देण्यात आला होता.
मात्र, आता प्रथमच ठाणे महापालिकेकडून या कुटुंबांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या नोटिशींमध्ये थकीत भाडे व इतर देयके तातडीने भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी भाडे भरण्याबाबत हरकत नसल्याचे स्पष्ट केले असले, तरीही भाडे भरल्यानंतरदेखील २५ मार्चपर्यंत घरे महापालिकेच्या ताब्यात देण्याचे आदेश देण्यात आल्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
उन्हाळ्याच्या तोंडावर कुटुंबांनी लहान मुले, महिला यांना घेऊन अचानक कुठे जायचे, असा गंभीर प्रश्न नागरिकांसमोर उभा ठाकला आहे. विशेष म्हणजे, राज्य शासनाने पहिली ते नववीच्या परीक्षा २२ एप्रिलपर्यंत निश्चित केल्या असून, या रेंटल इमारतींमध्ये राहणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढील आठवड्यात सुरू होत आहेत. अशा परिस्थितीत अचानक स्थलांतराच्या भीतीमुळे विद्यार्थ्यांवर मानसिक ताण निर्माण झाला असून त्यांच्या अभ्यासावरही परिणाम होत आहे.
एकूण सुमारे १४०० कुटुंबांवर बेघर होण्याची टांगती तलवार आहे. संबंधित रेंटल हाऊसिंग प्रकल्प वर्तक नगर येथील चार इमारतींमध्ये असून, हा परिसर आमदार प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघात येतो. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून नागरिकांना दिलासा देणारा निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600