जिल्हा
२७ अतिधोकादायक इमारतींमध्ये हजारो ठाणेकरांचा जीव मुठीत
ठाणे : शहरातील ७४ पैकी २७ अतिधोकादायक इमारतींमध्ये शेकडो कुटुंबांचे वास्तव्य असून या इमारती अद्याप रिकाम्या करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात एखादी मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे.
ठाणे पालिका क्षेत्रात ७४ अतिधोकादायक इमारती असून त्यापैकी नौपाडा-कोपरी प्रभाग समिती अंतर्गत सर्वाधिक ५० इमारतींचा समावेश आहे. अतिधोकादायक इमारतींच्या पडझडीमुळे निष्पाप नागरिकांचे जीव जात असतात. यावर्षी देखील पालिका प्रशासनाने पावसाळ्यात इमारत दुर्घटना होऊन नागरिकांचे बळी जावू नयेत यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
महापालिकेने शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी तयार केली आहे. पालिका प्रशासनाने ७४ पैकी २२ इमारती या रिक्त करून निष्कासित केल्या आहेत. २५ इमारती रिक्त करण्यात आल्या असून अद्याप निष्कासित करण्यात आलेल्या नाहीत. शहरातील एकूण अतिधोकादायक इमारतींपैकी २७ इमारतींमध्ये नागरिक जीव मुठीत घेऊन राहत आहेत. वागळे प्रभाग समितीत मात्र एकही इमारत धोकादायक नसल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600