जिल्हा
तीन बहिणींचा विषबाधेमुळे मृत्यू
शहापूर: शहापूर तालुक्यातील किन्हवलीजवळ असलेल्या अस्नोली गावात एकाच कुटुंबातील तीन सख्या बहिणींना सोमवारी (दि.२१)अन्नातून विषबाधा झाली होती. दुर्दैवाने या तिन्ही मुलींचा मृत्यू झाला.
चेरपोली येथील संदीप भेरे यांची पत्नी त्यांच्यापासून विभक्त होऊन मागील आठ महिन्यांपासून अस्नोली येथे आपल्या माहेरी काव्या (१०), दिव्या (८) व गार्गी (५) अशा तीन मुलींसोबत राहात होती. सोमवारी (दि.२१) तीनही मुलींना अन्नातून विषबाधा झाल्याने गावातील खासगी दवाखान्यात प्राथमिक उपचार करून शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने नातेवाईकांनी त्यांना कल्याण येथील वृंदावन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु प्रकृतीत कोणतीच सुधारणा होत नसल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथील मोठ्या हॉस्पिटलला नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार काव्या व दिव्या यांना मुंबई येथील वाडीया व नंतर नायर रुग्णालयात व गार्गीला नाशिक जिल्ह्यातील घोटी येथील एसएमबीटी रुग्णालयात हलवण्यात आले.
दरम्यान गुरुवारी (दि.२४ ) काव्या व गार्गी या दोघींचे वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये निधन झाले तर शुक्रवारी (दि.२५) सकाळी ११च्या सुमारास दिव्याचीही प्राणज्योत मालवली. एकाच कुटुंबातील तीन मुली दगावल्याने किन्हवली परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान तीनही मुलींना विषबाधा झाली असेल तर आई व आजीला बाधा कशी झाली नाही असा सवाल उपस्थित करत वडील संदीप भेरे यांनी पोलिसांना खबर दिली असून सदर मुलींच्या आईची शहापूर पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. वडीलांनीच संशय व्यक्त केल्याने या विषबाधा प्रकरणाचे गूढ वाढले असून एडीआर प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600