जिल्हा
मलंगगड परिसरात तीन ट्रेकर मध्यरात्री अडकले
मलंगगड परिसरात तीन ट्रेकर मध्यरात्री अडकले
फोटो: ठाणे वैभव
पहाटे झाली सुखरूप सुटका
अंबरनाथनजीक डोंगरावर अडकून पडलेल्या तीन पर्यटकांची सुटका करण्यात यश प्रशासनाला यश
अंबरनाथ: रिल्स पाहून अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरात ट्रेकिंगसाठी आलेल्या पण रस्ता चुकलेल्या मुंबईच्या मालाड परिसरातील तीन पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात बोहोनोलीचे ग्रामस्थ,पोलीस प्रशासन आणि अंबरनाथ अग्निशमन दलाला यश आले आहे.
मुसळधार पाऊस, अंधाराचे साम्राज्य पसरले असताना अश्या थरारक परिस्थितीमध्ये केलेल्या बचाव कार्याला यश येऊन अडकून पडलेल्या पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली असल्याची माहिती अंबरनाथ नगरपालिका अग्निशमन दलाचे अधिकारी भागवत सोनोने यांनी दिली.
मलंगगडाजवळ असलेल्या डोंगरावर तीन तरुण पर्यटनासाठी गेले होते. मात्र तिघेही तिथे अडकल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली होती. त्यानुसार अंबरनाथ अग्निशमन दलाचे अधिकारी भागवत सोनोने यांचे पथक आणि हिल लाईन पोलीस तसेच स्थानिक गावकरी तरुणांच्या मदतीने अडकलेल्या तीन तरुणांच्या सुटकेसाठी रवाना झाले होते.
रिल्स पाहून मुंबईच्या मालाड परिसरातून शिवम सिंग (२४), मंगेश प्रजापती (२५) आणि गुरुप्रसाद विश्वकर्मा (२४) हे तिघे ट्रेकिंगसाठी मलंगगडावर आले होते. अंबरनाथजवळील एका उंच टेकडीवर चढल्यानंतर उतरताना मात्र ते गडावरच अडकले. अग्निमशमन दलाप्रमाणे पोलिस प्रशासनाला माहिती मिळताच तरुणांच्या रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झाली. मध्यरात्री उशिरापर्यंत रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते. अथक प्रयत्नांननंतर स्थानिक गावकरी अग्निशमन दल आणि हिल लाईन पोलिसांच्या मदतीने अडकलेल्या तरुणांची सुखरूप सुटका करण्यात आली. अंदाजे १७०० फूट उंचीवरून खाली उतरण्याचा प्रयत्न केला मात्र रस्ता सापडेना, एका सहकाऱ्याच्या मोबाईलमध्ये नेटवर्क असल्याने संपर्क साधल्याचे एका युवकाने सांगितले.
मुसळधार पाऊस आणि अंधाराचे साम्राज्य असल्याने शोध कार्यात अडथळे येत होते. तिघांपैकी एकाच्या मोबाईलवरून संपर्क झाल्याने त्याने लोकेशन पाठवल्याने तपास करण्यास हातभार लागल्याचे अग्निशमन दल प्रमुख भागवत सोनोने यांनी सांगितले. बोहोनोली गावातील पाच ते सहा माहितगार ग्रामस्थांना घेऊन शोध मोहीम सुरु केली. त्यांच्यासमवेत फायरमन भांगरे, फायरमन नरसाळे, पाटील, म्हात्रे, वाहन चालक माने तसेच हिललाईन पोलीस स्थानकाचे कर्मचारी गुरव, शिपाई हेलिंगे, चाटूरे, पोलीस मित्र स्वदेश रसाळ, शिवाजीनगरचे व्हटकर यांच्यासह रात्री ११ च्या सुमाराला पथक डोंगरावर पोहोचले. त्यानंतर पहाटे पाचच्या सुमाराला तीन युवकांसह पथक सुखरूप दाखल झाल्याचे श्री.सोनोने यांनी सांगितले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600