जिल्हा
आई एकविरा देवी चैत्रोत्सवासाठी भाविकांना टोलमाफी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
ठाणे: संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत व जागृत देवस्थान असलेल्या वेहेरगाव, कार्ला, लोणावळा येथील आई एकविरा देवीच्या चैत्र यात्रोत्सवानिमित्त राज्यभरातून कार्ला येथे येणा-या भाविकांना दरवर्षी टोलमाफी मिळावी अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे माजी नगरसेवक संजय भोईर यांनी आज निवेदन सादर करून केली.
या मागणीची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाविकांसाठी टोलमाफी मिळण्याबाबत आश्वस्त केले तसेच यासाठी प्रभावी यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना देखील दिल्या. यावेळी नरेश म्हस्के हे देखील उपस्थित होते.
३, ४ व ५ एप्रिल, २०२५ रोजी कुलस्वामिनी एकविरा देवीचा उत्सव होणार आहे. या यात्रोत्सवासाठी ठाणे, मुंबई, रायगड, पालघर, पुणे यासह संपूर्ण महाराष्ट्रातून भक्तगण कार्ला येथे येत असतात. आगरी, कुणबी, कोळी, भंडारी समाजासह अनेकजण या चैत्रोत्सवात मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात. या काळात कार्ला येथे आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांचा प्रवास पुणे द्रुतगती महामार्गावरून होतो. दर्शनासाठी येत असताना भाविकांना टोलचा आर्थिक भार सोसावा लागू नये अशी मागणी सातत्याने महाराष्ट्रभरातील भाविकांकडून होत होती. याची दखल घेत स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी गणेशोत्सवात कोकणवासीयांना तसेच आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर यात्रेनिमित्त वारक-यांना जशी टोलमाफी मिळते, त्याचप्रमाणे आई एकविरा देवीच्या चैत्रोत्सवासाठी येणा-या भाविकांच्या वाहनांना दरवर्षी टोलमाफी मिळावी, अशी मागणी केली. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज भेट घेतली. यावेळी श्री.शिंदे यांनी भाविकांना राज्य सरकारतर्फे पुणे महामार्गावर टोलमाफी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. या उपक्रमाकरिता ठोस उपाययोजना राबवण्याच्या देखील सूचना यावेळी श्री.शिंदे यांनी दिल्या. यावेळी ठाणे शहर खा. नरेश म्हस्के, युवासेना ठाणे शहर विधानसभा उपाध्यक्ष विकेश भोईर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600