महाराष्ट्र
कापूरबावडी-गायमुख जोड रस्त्यात जाणार दोन हजार झाडांचा बळी
* केवळ ५४९ झाडांचे होणार पूर्नरोपण
* घोडबंदरची वाहतूक कोंडी फुटणार
ठाणे : घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी कापूरबावडी ते गायमुख हा मुख्य रस्ता आणि सेवा रस्ता जोडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे यासाठी तब्बल 2196 झाडांचा बळी दिला जाणार आहे. या प्रकल्पात 549 झाडांचे पुनर्ररोपण करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे घोडबंदरची वाहतूक कोंडी सुटणार असली तरी, वृक्ष तोडीवरून हा प्रकल्प वादात पडण्याची शक्यता आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रांतर्गत येणाऱ्या घोडबंदर रोडवरून मुंबई, गुजरात आणि इतर राज्यांच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची दररोज वर्दळ असते. शिवाय, घोडबंदर परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आहे. तसेच या मार्गावर मेट्रोचे काम जोरदार सुरु असून दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने काही महिन्यांपूर्वी घोडबंदर मार्गाच्या दोन्ही बाजूंचे समांतर सेवा रस्ते मूळ मार्गात विलीन करून प्रत्येकी चार असे एकूण आठ पदरी काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
एमएमआरडीएने याबाबतचा प्रस्ताव ठाणे महापालिकेला दिला असून कापूरबावडी ते गायमुख हा ९.३० कि.मी. लांबीचा रस्ता संपूर्णपणे काँक्रिटचा असणार आहे. त्यासाठी ५६० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. महानगरपालिकेने झाड हटविण्याची परवानगी देऊन हे काम मार्गी लावावे, अशी मागणी एमएमआरडीए प्राधिकरणाने केली असल्याने पर्यावरणासाठी घातक ठरणार आहे.
बुलेट प्रकल्प, रस्ता रुंदीकरण, मेट्रो आणि इतर महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी ठाण्यात हजारो झाडे तोडण्यात आली आहेत. दुसरीकडे वृक्षतोडीच्या प्रस्तावांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून खासगी गृहप्रकल्पांच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोडीचे प्रस्ताव सादर केले जात आहेत.
शहरात प्रशासकीय राजवट सुरू असून आचारसंहितेमुळे विकास कामे संथ गतीने सुरू आहेत. एमआरडीए या झाडांच्या बदल्यात झाडे लावायला तयार नाही किंवा झाडांसाठी पैसेही द्यायला तयार नाही. या झाडांचा खर्च महापालिका प्रशासनाला उचलावा लागणार आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600