जिल्हा
अनधिकृत बांधकामे: तीन नगरसेवकांच्या अडचणीत वाढ
डोंबिवली: बेकायदा बांधकामांशी संबंधित असल्याने आणि उमेदवारी अर्ज भरताना खोटी माहिती दिल्याने कल्याण डोंबिवली महापालिकेतील तीन जणांचे नगरसेवक पद रद्द करण्याबाबत एक वकिलाने संबंधित विभागांना नोटिसा बजावल्या आहेत.
डोंबिवली पश्चिमेतील सत्ताधारी पक्षातील हे लोकप्रतिनिधी आहेत. यामध्ये एक ज्येष्ठ नगरसेवक आणि दोन नगरसेविकांचा समावेश आहे. या तिन्ही नगरसेवकांचा कागदोपत्री बेकायदा बांधकामांशी थेट संबंध असल्यामुळे आणि तक्रारदार कल्पेश जोशी यांनी सत्यप्रतिज्ञा पत्राद्वारे हे तिन्ही नगरसेवक बेकायदा बांधकामांशी कसे थेट संबंधित आहेत याची माहिती राज्य निवडणूक आयोगाला दिली आहे. त्याचबरोबर आयोगाने आवश्यक ती चौकशी प्रक्रिया पूर्ण करावी. कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून तीन नगरसेवकांची माहिती मागवून घ्यावी. या तीन नगरसेवकांचे पद महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम १० (१ ड) कलमान्वये रद्द (अनर्ह) करण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू करावी, अशी कायदेशीर नोटीस ॲड. अर्चना भसरे यांनी सचिव, राज्य निवडणूक आयोग, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, कोकण विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त आणि संबंधित नगरसेवकांना बजावली आहे.
या नोटिसांमुळे बेकायदा बांधकामाशी संबंधित नगरसेवकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. डोंबिवली पश्चिमेत एकूण आठ नगरसेवक बेकायदा बांधकामांशी संबंधित आहेत. या नगरसेवकांच्या विरूध्द त्यांचे प्रतिस्पर्धी पराभूत उमेदवार आणि इतर तक्रारदारांनी राज्य निवडणूक आयोग, उच्च न्यायालयात याचिका दाखल करून त्यांची नगरसेवक पदे रद्द करण्याबाबत कार्यवाही सुरू केली आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600