जिल्हा

दृष्टी हरवलेल्या सिद्धीच्या जिद्दीचा उलगडला अविश्वसनीय प्रवास

ठाणे: एका असाध्य विकाराने दृष्टी हरवलेल्या सिद्धी देसाई-उदास यांनी अपंगत्वावर मात करून सुरुवातीचे शिक्षण, मुंबईत महाविद्यालयीन शिक्षण आणि पुढे साता समुद्रापार जाऊन घेतलेले उच्च शिक्षण असा जिद्दीचा प्रवास त्यांच्या शाळेत उलगडून दाखवला. शिवसमर्थ विद्यालयात विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात त्या उपस्थित होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या. ठाण्यातील शिवसमर्थ विद्यालय विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकातील नाही, तर आयुष्य जगण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये अंगात बाणविते, जीवनात येणाऱ्या समस्यांशी लढण्याची ताकद देते. येथे प्रत्येक विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण ओळखून त्यांना फुलविले जाते. त्यामुळेच आज विविध क्षेत्रात शिव समर्थ विद्यालयाचे विद्यार्थी चमकताना दिसतात. हत्तींशी संवाद साधणारा आनंद शिंदे, मराठी चित्रपट निर्माते निखिल साने, लावणी नृत्य संशोधक सावित्री मेधातुल अशा विविध क्षेत्रात शिव समर्थ विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. आयुष्यात येणाऱ्या आव्हानांचा स्वीकार करत त्यांच्याशी सामना करून उच्च पदाला पोचलेल्या शिव समर्थ विद्यालयाच्या माजी विद्यार्थीनी सौ. सिद्धी देसाई-उदास यांनी त्यांची यशस्वी जीवनयात्रा उलगडून दाखविली. सिद्धी या याच शाळेतील शिक्षिका देसाईबाई यांची मुलगी. वयाच्या पाचव्या वर्षी एका असाध्य रोगाने तिची दृष्टी हिरावून नेली. पण सिद्धी जिद्दीने उभी राहिली. शाळेतील संस्कारित मुला-मुलींनी तिला प्रत्येक कार्यक्रमात, खेळात सामावून घेतले आणि कोणताही न्यूनगंड येऊ दिला नाही. शिक्षकांनीही शिकविताना तिला समजेल अशा पद्धतीने वर्गात शिकविले. तिला संगणक वापरता यावा म्हणून संगणक कक्षात विशेष सॉफ्टवेअरची व्यवस्था केली गेली. या सर्व धडपडीचा फायदा झाला. एसएससी परीक्षेत सिद्धी अपंग विद्यार्थ्यांत बोर्डात पहिली आली. मग तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. तिच्या आवडत्या विषयात अर्थशास्त्रात ती मुंबई युनिव्हर्सिटीतुन पदवीधर झाली. कॉलेजला एकटीच ट्रेनने जात होती. पुण्याला जाऊन उच्च पदवी मिळविली. तेव्हाच स्टुडंट एक्सचेन्ज प्रोग्रॅम अंतर्गत एकटीच कॅनडाला शिकण्यासाठी गेली. नंतर जर्मनीला शिकण्यासाठी गेली. जीआरई देऊन अमेरिकेत केंटुकी विद्यापीठातून गणित/संख्याशास्त्र या विषयात एम एस मिळविली. परदेशात ती एकटी राहात होती, आवश्यक तो प्रवास एकटी करत होती. भारतात परत आल्यावर ती आता स्टेट बँकेत (ठाणे शाखा) डेप्युटी मॅनेजर या पदावर काम करत आहे. दृष्टिहीनतेमुळे तिला वेगळे उपाय शोधावे लागत होते. त्याचा तिला फायदा मिळाला. आज बँकेत काम करताना येणाऱ्या समस्यांवर ती सहजपणे चौकटीबाहेर जाऊन उपाय शोधू शकते. यामुळे बँकेतही सहकाऱ्यांमध्ये तिच्याबद्दल आदरभावना आहे. आज तिने शिव समर्थ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसमोर आपला जीवनप्रवास उलगडताना 'जिद्द' म्हणजे काय हे दाखवून दिले. तिचे भाषण हे मुलांसाठी प्रेरणादायी होते. सगळेच विद्यार्थी तिच्या प्रवाही भाषणात गुंगून गेले होते.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600