जिल्हा
अवकाळी पावसाने शहापूर तालुक्याला झोडपले
अवकाळी पावसाने शहापूर तालुक्याला झोडपले
फोटो: ठाणे वैभव
* विटभट्टी, भाजीपाला उत्पादक हवालदिल
* लग्नसराईत वधू-वरांची तारांबळ
शहापूर: तालुक्यात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास अचानक झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे अनेक भागांत मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी जोरदार वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली असून वीजपुरवठाही खंडित झाला. या अवकाळी संकटामुळे विटभट्टीधारक, भाजीपाला उत्पादक शेतकरी, मंडप व्यावसायिक तसेच लग्नसराईतील वधू-वर पक्ष हवालदिल झाले आहेत.
तालुक्यात दिवसभर उकाड्याचे वातावरण असताना सायंकाळी अचानक काळे ढग दाटून आले आणि वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अनेक भागांतील विटभट्ट्यांवर तयार ठेवलेल्या विटांचे नुकसान झाले असून विटा भिजल्याने विटभट्टी व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तळवाडे ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या गांडूळवाड येथील मोहन नामा सोंगाळ यांचे घराचे पत्रे उडाले. तर दुसरीकडे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातील टोमॅटो, वांगी, मिरची, भेंडी यांसारख्या पिकांना फटका बसला. जोरदार वाऱ्यामुळे पिके आडवी झाली असून काही ठिकाणी शेतीतील संरक्षक जाळ्या व शेडनेटचेही नुकसान झाले आहे.
वादळी वाऱ्यामुळे काही गावांमध्ये झाडे रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. काही ठिकाणी विद्युत तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. ग्रामस्थांनी तत्काळ प्रशासनाला माहिती देत झाडे हटविण्याची मागणी केली. दरम्यान सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने अवकाळी पावसामुळे अनेक विवाह सोहळ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मंडपांमध्ये पाणी साचणे, सजावटीचे नुकसान होणे तसेच वधू-वर पक्षांची धावपळ उडाल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळाले.
अचानक झालेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकरी व व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून प्रशासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600