जिल्हा
बारावीच्या पेपरला जाताना विद्यार्थ्यावर काळाची झडप
बारावीच्या पेपरला जाताना विद्यार्थ्यावर काळाची झडप
फोटो: ठाणे वैभव
डोंबिवलीतील सोहम कठरेचा कळव्याजवळ लोकलमधून पडून मृत्यू
कल्याण: बारावीच्या पहिल्याच पेपरसाठी घरातून निघालेल्या डोंबिवलीतील सोहम कठरे (१८) या विद्यार्थ्याचा लोकलमधून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कळवा-मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान प्रचंड गर्दीमुळे तोल जाऊन तो लोकलमधून खाली पडल्याची प्राथमिक माहिती रेल्वे पोलिसांनी दिली असून या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.
सोहम हा डोंबिवली पूर्वेतील आजदेपाडा गावचा रहिवासी होता. त्याचे परीक्षा केंद्र कळव्यातील मनिषा विद्यालयात आले होते. मूळचा सातारा जिल्ह्यातील असलेला सोहम शिक्षणासाठी डोंबिवलीत आपल्या मामाकडे राहत होता. बारावीच्या परीक्षेचा पहिला पेपर असल्याने तो नेहमीप्रमाणे सकाळी लवकर घरातून निघाला होता. मात्र सकाळच्या वेळेतील प्रचंड रेल्वे गर्दी त्याच्या जीवावर बेतली आणि धावत्या लोकलमधून पडून त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस व स्थानिक नागरिकांनी धाव घेतली. मात्र गंभीर दुखापतींमुळे सोहमचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेनंतर आजदेपाडा परिसरासह त्याच्या मित्रपरिवारात शोककळा पसरली आहे. एका होतकरू विद्यार्थ्याचा असा अंत झाल्याने सर्वत्र संताप आणि वेदना व्यक्त होत आहेत. मयत सोहमचे शव पुढील उत्तर कार्यासाठी त्याच्या मूळगावी सातारा येथे नेण्यात आले आहे.
मयत सोहमचा मामेभाऊ प्रमोद कठरे यांनी शोकाकुल शब्दांत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, आज सकाळी आमच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला. बोर्डाच्या परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी सेंटर दिले जातात. सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची प्रचंड गर्दी असते. अशा परिस्थितीत विद्यार्थी जीव मुठीत धरून प्रवास करतात. प्रशासनाने परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रवासाची व्यवस्था करावी, जेणेकरून पुढे असे अपघात घडणार नाहीत. रेल्वे क्रॉसिंग व गर्दीमुळे सातत्याने अपघात होत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. विद्यार्थ्यांचे जीव महत्त्वाचे आहेत. प्रशासनाने याबाबत ठोस उपाययोजना करावी, अशी भावनिक मागणी त्यांनी केली. या दुर्दैवी घटनेमुळे उपनगरी रेल्वेतील गर्दीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600