जिल्हा
डॉक्टर, परिचारिकेविना ठाण्यात आपला दवाखाना
डॉक्टर, परिचारिकेविना ठाण्यात आपला दवाखाना
फोटो: ठाणे वैभव
माजी नगरसेवक नारायण पवार यांनी वेधले लक्ष
ठाणे: राज्य सरकारच्या प्रतिष्ठेच्या आपला दवाखाना' योजनेंतर्गत ठाण्यातील रायगड गल्लीत सुरू केलेला दवाखाना हा डॉक्टर व परिचारिकेविना सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार काल आढळला. या प्रकाराकडे भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी महापालिकेचे लक्ष वेधून कंत्राटदार कंपनीवर कारवाईची मागणी केली आहे.
राज्य सरकारच्या आरोग्य विभागाची `आपला दवाखाना' ही प्रमुख योजना आहे. या योजनेंतर्गत राज्यातील रुग्णांना मोफत आरोग्य तपासणी, मोफत औषधे, मोफत रक्त व आरोग्य तपासणी आणि सवलतीच्या दरात निदान सेवा असे फायदे दिले जातात. आपल्या भागातच रुग्णांना वेळीच मोफत उपचार व्हावेत, असा या योजनेचा उद्देश आहे. मात्र, `आपला दवाखाना'मध्ये रुग्णांना सुविधा मिळत नसल्याचा आरोप होत आहे.
महापालिकेच्या वतीने रायगड गल्लीत `आपला दवाखाना' सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणी टेकडी बंगला येथील रुग्ण पांडुरंग कोंगरे काल रात्री साडेआठच्या सुमारास `टीटी'चे इंजेक्शन घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी `आपला दवाखाना'मध्ये डॉक्टर, परिचारिकेसह एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. या ठिकाणी कोणीही हजर नसल्यामुळे अनेक रुग्णांना उपचाराविना परतावे लागले.
या प्रकाराची माहिती रुग्णांनी भाजपाचे माजी गटनेते नारायण पवार यांना दिली. या प्रकाराची नारायण पवार यांनी महापालिकेकडे तक्रार केली आहे. तसेच डॉक्टर, परिचारिका नियुक्तीचे कंत्राट दिलेल्या संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
`आपला दवाखाना' सुरू करण्यामागील उद्देश साध्य होत नसून, कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी होत आहे. त्याऐवजी राज्य सरकार व महापालिकेच्या सार्वजनिक हॉस्पिटलमध्ये रुग्णांना सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी नारायण पवार यांनी केली.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600