जिल्हा
झेडपी शाळा आणि विद्यार्थी सीसी टीव्हीच्या निगराणीखाली
झेडपी शाळा आणि विद्यार्थी सीसी टीव्हीच्या निगराणीखाली
फोटो: ठाणे वैभव
* पहिल्या टप्प्यात ५२४ शाळांमध्ये कॅमेरे बसवले
* यावर्षी ७८६ शाळांचे उद्दिष्ट
ठाणे: विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शाळांचा पारदर्शक कारभार या दृष्टीने जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत ५२४ शाळांमध्ये ही यंत्रणा बसविण्यात आली असून या वर्ष अखेरपर्यंत ७८६ शाळांमध्ये ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे.
जिल्हा नियोजन समितीमार्फत सन २०२४-२५ मधील उपलब्ध तरतुदीतून मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या टप्प्यात एकूण ५४२ शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत कल्याण तालुक्यात १२० सीसीटीव्ही, भिवंडी ३०८ सीसीटीव्ही बसविण्याचे काम १०० टक्के पुर्ण असून अंबरनाथ तालुक्यात ९६ सीसीटीव्ही बसवण्यात आले तर १८ शाळेतील कामकाज प्रगतीपथावर आहे. असे एकूण ५२४ शाळांमध्ये शिक्षण विभाग (प्राथमिक) कार्यालयामार्फत सीसीटीव्ही बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे.
जिल्हा नियोजन समितीमार्फत सन २०२५-२६ मधील जिल्हा नियोजन समितीच्या उपलब्ध निधीतून सीसीटीव्ही बसविण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. मुरबाड गटातील ३२९ शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे काम नियोजित वेळेत सुरू असून या शाळांमधील सर्व यंत्रणा मार्च २०२६ अखेरपर्यंत कार्यान्वित होणार आहेत. शहापूर गटातील ४५७ शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे काम नियोजित वेळेत सुरू असून या शाळांमधील सर्व यंत्रणा एप्रिल २०२६ अखेरपर्यंत कार्यान्वित होणार आहेत.
जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी तसेच शाळांमधील शैक्षणिक वातावरण अधिक सुरक्षित आणि पारदर्शक ठेवण्यासाठी ही यंत्रणा महत्त्वाची ठरणार आहे. शाळेच्या परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवणे, अनुचित प्रकारांना प्रतिबंध करणे आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे या दृष्टीने ही सीसीटीव्ही योजना राबविण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे काम शीघ्रतेने करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात ५२४ शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आले असून उर्वरित शाळांमध्येही शीघ्रतेने सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात येत आहे. यामुळे शाळांमधील वातावरण अधिक सुरक्षित व शिस्तबद्ध राहण्यास मदत होणार आहे, असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी सांगितले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600