जिल्हा
आजपासून बारावीची परीक्षा
* जिल्ह्यात एक लाख ८०५४ विद्यार्थी
* कॉपीमुक्त परीक्षेसाठी सात भरारी पथके
ठाणे: उद्यापासून बारावीची तर २० फेब्रुवारीपासून दहावीची परीक्षा सुरु होत आहे. या परीक्षेत कॉपी रोखण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर देखरेख ठेवण्यासाठी सात भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षा केंद्र परिसरातील झेरॉक्स दुकानें देखिल बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ठाणे जिल्ह्यातील १९३ केंद्रांवर उद्यापासून बारावीची परीक्षा सुरु होणार असून या परीक्षेला ५५,५७६ मुले आणि ५२,४७८ मुली असे एकूण एक लाख ८०५४ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. विज्ञान शाखेत ४४,४६३, वाणिज्य शाखेत ४८,७२२ आणि कला शाखेत १४,४१४ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. ही परीक्षा १८ मार्चपर्यंत असणार आहे.
दरम्यान दहावीची परीक्षा २० फेब्रुवारीपासून सुरु होणार असून ही परीक्षा ३२६ केंद्रांवर घेतली जाणार आहे. या परीक्षेला जिल्ह्यातून एक लाख १९,७४२ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत.
परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण विभागाने कडक पावले उचलली आहेत. जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग शिक्षणाधिकारी, तसेच महिला भरारी पथक या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी कार्यरत राहणार आहेत. ठाणे जिल्ह्यात दहावी आणि बारावी परीक्षेला प्रत्येकी एक केंद्र संवेदनशील केंद्र घोषित करण्यात आले असून या केंद्रांवर बैठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. त्याचबरोबर परीक्षा केंद्रांच्या परिसरातील झेरॉक्स दुकाने परीक्षा सुरू असताना बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600