जिल्हा
पाणीचोरी आणि गळतीमुळे २० टक्के पाणी जाते वाया
पाणीचोरी आणि गळतीमुळे २० टक्के पाणी जाते वाया
फोटो: ठाणे वैभव
भिवंडी शहरात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई
भिवंडी : भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील अनेक भागांमध्ये ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. गरजेपेक्षा कमी होणारा पाणीपुरवठा आणि त्यातच उपलब्ध असलेल्या पाण्यात करण्यात आलेली कपात, ही या परिस्थितीची मुख्य कारणे आहेत. शहराला पूर्वी मिळणाऱ्या १२६ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्यापेक्षा सध्या ११ दशलक्ष लिटर पाणी कमी मिळत आहे. असे असले तरी बाधित भागांमध्ये महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग दररोज टँकरद्वारे पाणीपुरवठा करून नागरिकांची पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
महानगरपालिका क्षेत्राची एकूण लोकसंख्या सुमारे १२ लाख इतकी असून, या नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन विविध योजना राबवित आहे. भिवंडीतील विशेषतः काही कामगार व सामान्य लोकवस्ती आणि उंचावरील झोपडपट्टी या सारख्या २८ झोपडपट्टी भागांमधील रहिवासी तीव्र पाणीटंचाईचा सामना करत आहेत. या सर्व भागांना त्यांच्या प्रत्यक्ष गरजेपेक्षा खूपच कमी पाणीपुरवठा होत आहे. ही तूट भरून काढण्यासाठी, महानगरपालिका मागणीनुसार टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करत आहे. शहरांतील जवळपास सर्वच झोपडपट्ट्यांमध्ये, कमी-अधिक प्रमाणात, पिण्याच्या पाण्याची अशीच गंभीर टंचाई भेडसावत आहे.
महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप पटनावर यांनी सांगितले की, १२ लाख लोकसंख्या असलेल्या भिवंडी शहराला दररोज १८० दशलक्ष लिटर प्रतिदिन पाण्याची आवश्यकता असते. मात्र, महानगरपालिकेला सध्या केवळ ११५ एमएलडी पाणी मिळत आहे. यापैकी ७३ एमएलडी पाणी 'स्टेम' प्राधिकरणाकडून आणि ४२ एमएलडी पाणी मुंबई महानगरपालिकेकडून मिळते. त्यामुळे सध्या ६५ एमएलडी पाण्याची तूट निर्माण झाली आहे.
यापूर्वी महानगरपालिकेच्या वऱ्हाळा तलावातून दररोज पाच एमएलडी अतिरिक्त पाणी मिळत असे. परंतु तलावातील वाढते प्रदूषण आणि पाणी दूषित झाल्याने 'राष्ट्रीय हरित लवादा'ने या तलावातील पिण्याचे पाणी उपसण्यावर बंदी घातली आहे. याव्यतिरिक्त, 'स्टेम' प्राधिकरणानेही अलीकडेच आपल्या पाणीपुरवठ्यात सहा एमएलडी पाण्याची कपात केली आहे. त्यामुळे शहराच्या ज्या भागांमध्ये पाणीकपात लागू आहे, तिथे आता टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे सध्या तीन टँकर्स उपलब्ध आहेत. आणखी दोन टँकर्स भाड्याने घेऊन, एकूण पाच टँकर्सचा ताफा गरजू भागांमध्ये पद्धतशीरपणे पाणीपुरवठा करण्यासाठी वापरला जात आहे, शिवाय, मुंबई महानगरपालिकेकडे दररोज अतिरिक्त पाच एमएलडी पाणीपुरवठा करण्याची विनंती करण्यात आली आहे. ही विनंती मंजूर झाल्यानंतर आणि वऱ्हाळा तलावातून होणारा पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्यानंतर शहरातील पाणीटंचाईची समस्या बऱ्याच अंशी सुटण्याची अपेक्षा आहे. या उपाययोजनां व्यतिरिक्त, दैनंदिन वापरासाठीचे अनेक भागांना बोअरवेल्स आणि विहिरींच्या माध्यमातून पाणी पुरवले जात आहे. जनतेच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे,असे कार्यकारी अभियंता संदीप पटनावर यांनी सांगितले.
शहरातील ९०३ हातपंपांपैकी सुमारे २५० हातपंप सध्या बंद (अकार्यक्षम) अवस्थेत आहेत. २६० जेट पंपांपैकी ३५ पंप सध्या नादुरुस्त आहेत. २४० सबमर्सिबल पंपांपैकी ६२ पंप अकार्यक्षम आहेत. शहरात एकूण ११४ विहिरी आहेत, त्यापैकी ८६ विहिरी कचऱ्यामुळे बुजून गेल्या आहेत. उर्वरित २६ विहिरींमधील पाणी पिण्यास अयोग्य आहे. दरम्यान, पाणीचोरी आणि दैनंदिन गळतीमुळे पाण्याचा सुमारे २० टक्के भाग वाया जात आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600