जिल्हा

पदपथावरच अनधिकृत गोठा; रस्त्यावरून चालण्याची वेळ

पदपथावरच अनधिकृत गोठा; रस्त्यावरून चालण्याची वेळ
पदपथावरच अनधिकृत गोठा; रस्त्यावरून चालण्याची वेळ फोटो: ठाणे वैभव
आझादनगरमध्ये पदाचाऱ्यांचा जीव मुठीत ठाणे: ठाण्यातील माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत येणाऱ्या आझाद नगर सॅन्डोझ बाग परिसरातील मुख्य रस्त्यावरील पदपथावर चक्क एक अनधिकृत गोठा उभारण्यात आला आहे. या अतिक्रमणामुळे नागरिकांचा चालण्याचा रस्ता पूर्णपणे बंद झाला असून, पादचाऱ्यांना आणि शालेय विद्यार्थ्यांना नाईलाजाने वर्दळीच्या मुख्य रस्त्यावरून चालावे लागत आहे. यामुळे परिसरात अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे. आझादनगर येथील 'रिजन्सी बिझनेस पार्क'च्या समोर बांबू आणि कापड/ताडपत्रीच्या साहाय्याने हा गोठा उभारण्यात आला आहे. पदपथावर जनावरे बांधल्यामुळे तिथे सतत शेण, मूत्र आणि उरलेला चारा पडून असतो. परिणामी, परिसरात भयंकर दुर्गंधी पसरली असून डासांचा आणि इतर कीटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे स्थानिक नागरिकांच्या आणि पादचाऱ्यांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. तसेच, रहदारीच्या रस्त्याशेजारी जनावरे बांधणे हे स्वतः त्या मुक्या प्राण्यांसाठीही अमानवीय आणि धोकादायक आहे. अचानक एखादे जनावर बिथरून रस्त्यावर आल्यास मोठा अपघात होऊ शकतो. या गंभीर समस्येबाबत जागरूक नागरिकांकडून ठाणे महापालिकेचे माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त आणि प्रदूषण नियंत्रण कक्ष यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पदपथावरील हा अनधिकृत गोठा तातडीने हटवून पदपथ अतिक्रमणमुक्त करावा, बांधलेल्या जनावरांची योग्य आणि सुरक्षित ठिकाणी रवानगी करावी, आरोग्याचा धोका टाळण्यासाठी संबंधित पदपथाची महापालिकेकडून त्वरित स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्यात यावे, अशा मागण्या नागरिकांनी केल्या आहेत. ठाणे महापालिकेने आणि प्रदूषण नियंत्रण विभागाने यावर तातडीने संयुक्त कारवाई करावी, अन्यथा नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या या समस्येविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जाईल, असा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600