जिल्हा

तानसाचे २१ दरवाजे उघडले; बारवी धरण ८१ टक्के भरले

तानसाचे २१ दरवाजे उघडले; बारवी धरण ८१ टक्के भरले
तानसाचे २१ दरवाजे उघडले; बारवी धरण ८१ टक्के भरले फोटो: ठाणे वैभव
शहापूर: सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारे शहापूर तालुक्यातील तानसा धरण तुडुंब भरुन वाहू लागल्याने धरणाच्या ३८ दरवाज्यांपैकी २१ दरवाजे उघडण्यात आले असून यामधून २२१०५.२० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे तर ठाणे जिल्ह्यातील काही शहरांना पाणी पुरवठा करणारे बारवी धरण ८१ टक्के भरले असून लवकरच या धरणातून देखील पाण्याचा विसर्ग करावा लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तानसा धरणातून मुंबईकरांना प्रतिदिन ४५५ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. या धरणाला एकूण ३८ दरवाजे असून त्यांची उंची १३३ फूट आणि लांबी २८३४.६४ मीटर असलेल्या तानसा धरणाची ४० हजार ६६० दशलक्ष गॅलन पाणी साठवण्याची क्षमता आहे. धरण क्षेत्रात असाच पाऊस पडत राहिला तर तानसाचे सर्वच ३८ दरवाजे उघडावे लागतील अशी शंका व्यक्त केली जाते. तानसा पाठोपाठ मोडकसागर धरणही लवकरच भरण्याची शक्यता असून आज-उद्या मोडक सागर देखील तुडुंब भरुन वाहू शकेल, असा अंदाज तानसा जल विभागाकडून व्यक्त केला जात आहे. ठाणे जिल्ह्यातील महत्वाच्या शहरांना पाणी पुरवठा करणारे बारवी धरण आज 81 टक्के भरले असून नदीकिनारी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बारवी धरण क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसाने बारवी धरण 81 टक्के भरले आहे. समाधानकारक पावसाने यंदा जुलै महिन्याच्या अखेरीला बारवी धरण ओव्हर फ्लो होण्याची शक्यता आहे. 25 जुलै रोजी धरणातील पाणीसाठा 83.07 टक्के झाला आहे. धरणातील पाणीपातळी 70.60 मीटर आहे तर धरण भरून वाहण्याची पातळी 72.60 मीटर आहे. धरण क्षेत्रात सतत पावसाचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढल्यास धरणाचे स्वयंचलित दरवाजे येत्या काही दिवसांत धरणाचे दरवाजे उघडून बारवी नदीत पाणी विसर्ग प्रक्रिया करण्यात येईल असे एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता यांनी जाहीर केले आहे. दरम्यान बारवी नदीकिनारी असलेल्या अस्नोली, चांदप, पिंपळोली, सागाव, पाटीलपाडा, मोऱ्याचा पाडा, रहाटोली आदी परिसरातील आणि गावातील नागरिकांना प्रशासकीय यंत्रणेद्वारे सतर्कतेच्या सूचना देण्याची विनंती करण्यात आली आहे. तसेच वाढत्या पाण्याच्या प्रवाहात जाण्यास अथवा पर्यटनाला जाण्यास मज्जाव करण्याच्या सूचना द्याव्यात असे आवाहन करणारे पत्रक एमआयडीसीतर्फे जारी करण्यात आले आहे. कल्याण, मुरबाड, अंबरनाथ, उल्हासनगर तहसीलदार यांना याबाबत कळवण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600