जिल्हा
२४ उमेदवारांना तीन वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी
२४ उमेदवारांना तीन वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी
फोटो: ठाणे वैभव
भिवंडी महापालिकेच्या निवडणुकीत खर्चाचा हिशेबच दिला नाही
भिवंडी : महापालिका निवडणुकीत खर्चाचा हिशेब देण्यास टाळाटाळ करणाऱ्या २४ उमेदवारांना कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी निवडणूक लढवण्यास आणि महापालिकेचे सदस्य होण्यास अपात्र घोषित केले आहे. या धडक कारवाईमुळे भिवंडीतील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
भिवंडी-निजामपूर शहर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक-२०२६ मध्ये एकूण ४३८ उमेदवारांनी निवडणूक लढविली होती. राज्य निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार ही निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रत्येक उमेदवाराला आपल्या खर्चाचा लेखाजोखा विहित मुदतीत तपासणी अधिकाऱ्यांकडे सादर करणे बंधनकारक होते. या साठी महापालिकेच्या निवडणूक विभाग आणि लेखा विभागाकडून वारंवार कायदेशीर कारवाई करीत नोटीस बजावून देखील भिवंडीतील २४ उमेदवारांनी याकडे दुर्लक्ष केले. उमेदवारांना आपली बाजू मांडण्याची पूर्ण संधी देण्यात आली होती. यासाठी कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात २५ मे आणि २९ जून २०२६ अशी दोन वेळा सुनावणी आयोजित करण्यात आली होती.
अखेर कोकण विभागाच्या विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी महानगरपालिका अधिनियम, १९४९ चे कलम १० (१ ई) आणि राज्य निवडणूक आयोगाच्या १५ विशेष फेब्रुवारी २०२४ रोजीच्या आदेशान्वये मिळालेल्या अधिकारांचा वापर करत २ जुलै रोजी महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक आदेश जारी केला. अनर्हतेचा कालावधी आदेशाच्या दिनांकापासून म्हणजेच २ जुलैपासून पुढील तीन वर्षांपर्यंत लागू राहणार आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशांचे पालन न करणे या उमेदवारांना चांगलेच महागात पडले असून, पुढील ३ वर्षे या सर्वांचे राजकीय भवितव्य आता टांगणीला लागले आहे.
प्रशासनाने अपात्र ठरवलेल्या २४ उमेदवारांमध्ये कृतिका पाटील, विजया गायकवाड, शरद पाटील, रेहान अन्सारी, तेजश्री पाटील, शोएब शेख, सलीम अन्सारी, जरीना अन्सारी, तुंबा अन्सारी, रिजवान खान, रविश खान, इमरान हाशमी, नदीम मोमीन, कमरुन्निसा अन्सारी, अजीम शेख, अनुशा वेंगल, विजय कारमपुरी, रितिषा घोईल, अस्मिता तांबे, नितेश गायकवाड , सोहेल अन्सारी, निरबान हुसैन, आजम खान आणि सुशांत म्हात्रे यांचा समावेश आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600