जिल्हा
अंतर्गत भूमिगत मेट्रोबाबत व्यापक जनसंवादाची गरज
अंतर्गत भूमिगत मेट्रोबाबत व्यापक जनसंवादाची गरज
फोटो: ठाणे वैभव
आ. ॲड. निरंजन डावखरे यांची विधानपरिषदेत भूमिका
ठाणे : ठाणे शहरासाठी प्रस्तावित अंतर्गत मेट्रो प्रकल्पाबाबत नागरिकांच्या मनात निर्माण झालेल्या शंका, संभ्रम आणि पुनर्वसनासंदर्भातील प्रश्न आज विधानपरिषदेत कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी प्रभावीपणे मांडले. विकास प्रकल्पांना विरोध नसून, नागरिकांना विश्वासात घेऊन आणि त्यांचे प्रश्न सोडवतच प्रकल्पांची अंमलबजावणी व्हावी, अशी भूमिका त्यांनी सभागृहात स्पष्टपणे मांडली.
अर्धा तास चर्चेदरम्यान बोलताना आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी ठाणेकरांच्या मनातील प्रमुख प्रश्न सभागृहासमोर मांडले. ठाणे रेल्वे स्थानक ते घोडबंदर रोड हा प्रवास सध्या तुलनेने कमी वेळात पूर्ण होत असताना प्रस्तावित अंतर्गत मेट्रोच्या मार्गावरील अनेक स्थानकांमुळे प्रवासाचा कालावधी वाढणार असल्याची नागरिकांमध्ये भावना आहे. त्यामुळे या प्रकल्पाची आवश्यकता, त्याचे दीर्घकालीन फायदे आणि वाहतूक व्यवस्थेतील भूमिका याबाबत प्रशासनाने नागरिकांशी थेट संवाद साधणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
विशेषतः जुन्या ठाणे परिसरातील कोळीवाडा आणि इतर पारंपरिक वस्त्यांमधील सीमांकनाचे प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. अनेक ठिकाणी २० ते २५ वर्षांपूर्वी उभारलेल्या इमारती आणि घरांच्या खाली भूमिगत कामे होणार असल्याने नागरिकांच्या सुरक्षेबाबत आणि मालमत्तेच्या संरक्षणाबाबत मोठ्या प्रमाणात चिंता व्यक्त केली जात आहे. या भागातील नागरिकांनी जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका प्रशासनाकडे निवेदने सादर केली असली तरी त्यांना समाधानकारक माहिती किंवा स्पष्ट भूमिका मिळालेली नसल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी प्रकल्पासाठी स्थानिक नागरिक, वास्तुविशारद, तज्ज्ञ, व्यापारी, स्थानिक रहिवासी आणि लोकप्रतिनिधी यांच्या स्वतंत्र बैठका आयोजित करून त्यांना प्रकल्पाची संपूर्ण माहिती देण्याची मागणी केली. तसेच प्रस्तावित अंतर्गत मेट्रोची मुंबई मेट्रो लाईन-४ आणि उपनगरी रेल्वे व्यवस्थेशी प्रभावी एंड-टू-एंड कनेक्टिव्हिटी कशी साधली जाणार, याबाबतही शासनाने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावर उत्तर देताना उद्योगमंत्री श्री. उदय सामंत यांनी ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पाचा सविस्तर डीपीआर तयार करताना वाहतूक व्यवस्थापन, कोळीवाड्याच्या सीमांकनाचा प्रश्न, पुनर्वसन तसेच नागरिकांना होणारा संभाव्य त्रास या सर्व बाबींचा विचार करण्यात आल्याचे स्पष्ट केले.
आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी व्यक्त केलेल्या सूचनांची दखल घेत उद्योगमंत्री श्री. सामंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने निर्देश देऊन मेट्रो प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी, महानगरपालिका अधिकारी आणि नागरिकांच्या प्रतिनिधींसमवेत व्यापक सादरीकरण आणि चर्चासत्र आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन दिले. एका महिन्याच्या आत संबंधित सर्व घटकांना विश्वासात घेऊन बैठक आयोजित केली जाईल आणि नागरिकांच्या शंकांचे निरसन केले जाईल, असे त्यांनी सभागृहात सांगितले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600