जिल्हा
तिसऱ्या मजल्यावरून बाळ पडले; रहिवाशाने झेलले!
तिसऱ्या मजल्यावरून बाळ पडले; रहिवाशाने झेलले!
फोटो: ठाणे वैभव
डोंबिवली : देव तरी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यंतर डोंबिवलीत दिसून आला. दोन वर्षाचे बाळ अचानक इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडले. तेथील रहिवाशाने त्याला झेलण्याचा प्रयत्न केला. मात्र ते बाळ हातातून पायावर पडले. त्यामुळे बाळ थोडक्यात बचावले.
पश्चिमेकडील अनुराज हाईट्स टॉवरमध्ये शनिवारी 25 तारखेला दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेचे सर्व चित्रण इमारतीच्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून ते बाळ पडले. त्यावेळी त्याच इमारतीतून नुकत्याच बाहेर पडलेल्या भावेश म्हात्रे या रहिवाशाने ते दृष्य पाहिले. बाळ पडत असतानाच त्याने त्यास झेलण्याचा प्रयत्न केला. ते बाळ झेलताना भावेशच्या हातातून पायावर पडले. त्यामुळे बाळ थोडक्यात बचावले.
या घटनेमुळे भावेशचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या घटनेबाबत आमदार रवींद्र चव्हाण म्हणाले, डोंबिवलीतील देवीचापाडा येथील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडणाऱ्या दोन वर्षीय बाळाचा जीव भावेश म्हात्रे या तरुणाच्या प्रसंगावधानामुळे वाचला. त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच, अशा शब्दांत श्री.चव्हाण यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600