जिल्हा
लातूरच्या 'त्या' शेतकऱ्याला बदलापुरातून मदतीचा हात
लातूरच्या 'त्या' शेतकऱ्याला बदलापुरातून मदतीचा हात
फोटो: ठाणे वैभव
बदलापूर : आर्थिक परिस्थितीमुळे लातूरच्या एका वृद्ध शेतकऱ्यावर शेतीची कामे करण्यासाठी स्वतःला नांगराला जुंपण्याची वेळ आली. याबाबतचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक जण त्यांच्या मदतीसाठी पुढे येऊ लागले आहेत.
बदलापुरातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनीही त्या शेतकऱ्याला ४० हजार रुपयांची रोख रक्कम मदत म्हणून दिली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस देशमुख त्यांच्या सहकाऱ्यासह लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील हडोळती गावी पोहचले व त्यांनी शेतकरी अंबादास पवार आणि त्यांच्या पत्नीची भेट घेऊन ४० हजार रुपये रोख रक्कम त्यांना मदत म्हणून दिली. शेतकरी पवार यांच्यावर जिल्हा बँकेचे ४० हजार रुपये कर्ज असल्याचे समजले. त्यामुळे पक्षाध्यक्ष शरदचंद्र पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या सूचनेनुसार या शेतकर्यांच्या बांधावर जाऊन जिल्हा बँकेचे कर्ज फेडण्यासाठी रोख रक्कम देऊन श्री. देशमुख यांनी त्यांना मदतीचा हात दिला.
आषाढी एकादशीचे औचित्य साधून माजी मंत्री विनायक पाटील यांच्या हस्ते वृद्ध शेतकरी पवार दांपत्याला विठु माऊलीची मूर्तीही भेट देण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे लातूर जिल्हाध्यक्ष संजय शेटे, प्रदेश सचिव परमेश्वर घोगरे व मुरबाड तालुकाध्यक्ष दीपक वाघचौरे आदींसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते होते. या वृद्ध शेतकऱ्याला स्वतःला नांगराला जुंपण्याची वेळ आल्याचे व्हिडिओ, बातम्या वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रातून तसेच सोशल मीडियावर पाहिल्या होत्या. त्यामुळे मन अस्वस्थ झालं आणि या वृद्ध शेतकरी दाम्पत्याच्या मदतीसाठी आपणही खारीचा वाटा उचलावा या भावनेतून सहकार्य केल्याचे देशमुख यांनी सांगितले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600