महाराष्ट्र
भल्या पहाटे भरधाव कारने पादचाऱ्याला चिरडले
ठाणे : एकीकडे रस्ते रुंद होत असताना दुसरीकडे वाहन चालकांची बेदरकार वृत्तीही वाढू लागली आहे. याच बेदरकार वृत्तीमुळे एका पादचाऱ्याला आपला जीव गमावावा लागला आहे.
कामाला पायी चाललेल्या एका पादचाऱ्याला भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने धडक दिल्याने पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे पाच वाजता पोखरण रोड २ येथे घडली.
अशोक रेपाळे (४७) असे मृत्यू पावलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. ते पोखरण रोड येथिल गांधी नगर भागात राहत होते. श्री. रेपाळे यांचा मिसळ पाव विक्रीचा व्यवसाय आहे. पहाटे ते त्यांच्या मित्राबरोबर पायी जात असताना भरधाव वेगाने आलेल्या पांढऱ्या रंगाच्या कारने त्यांना जोरात धडक दिली. त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.
वाहन चालक गाडी तिथेच टाकून पळून गेला आहे. हा चालक दारूच्या नशेत असावा असा अंदाज या भागातील नागरिकांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी गांधी नगर येथे राहणारे गोरक्ष ठुबे यांनी चितळसर-मानपाडा पोलिस ठाण्यात आरोपी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलिस उप निरीक्षक विद्या माने या करत आहेत.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600