महाराष्ट्र
महाराष्ट्रात महायुतीला लागणार मनसेचे इंजिन
ठाणे: लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. इंडिया आघाडीविरुद्ध महायुतीमध्ये सरळ सामना होण्याची शक्यता असतानाच महाराष्ट्र नव निर्माण सेना महायुतीमध्ये सामिल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. गुडी पाडव्याला या बाबतची घोषणा होईल, असे मनसेतील खास सूत्रांनी सांगितले.
मागील काही दिवस मनसेच्या प्रमुख नेत्यांच्या भाजपातील वरिष्ठ नेत्याबरोबरच्या भेटीगाठी वाढल्या आहेत, परंतु ते युतीमध्ये सहभागी होणार कि नाही हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या विरोधात महायुतीने समविचारी पक्षांना सोबत घेतले आहे. मनसेचे देखिल विचार त्यांच्याबरोबर मिळते जुळते आहेत तसेच शिवसेना आणि काँग्रेस हा मनसेचा एक नंबरचा राजकीय शत्रू आहे, त्यामुळे मनसे महायुतीमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. महायुतीने देखिल त्यांना दोन जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे.
मनसे महायुतीमध्ये सहभागी झाली तर भाजपाला महाराष्ट्रात ४५ जागा जिंकण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. कल्याण लोकसभा मतदारसंघात त्याचा फायदा विद्यमान खासदार मुख्यमंत्री पुत्र डॉ.श्रीकांत शिंदे यांना होणार आहे. त्यामुळे मनसेने महायुतीमध्ये सहभागी व्हावे यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे हे देखिल प्रयत्नशील आहेत. त्यांनी देखिल मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली होती.
परप्रांतीय मुद्द्यावर भाजपच्या दिल्लीमधील वरिष्ठ नेत्यांचा मात्र मनसेबाबत वेगवेगळे मत आहे. त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न राज्यातील नेत्यांनी केले असून दिल्ली येथून हिरवा कंदील मिळाल्याने मनसे महायुतीमध्ये सामिल होऊ शकते, असे सूत्राने सांगितले.
मनसे भाजपासोबत आली तर मुंबईतील सहाही लोकसभा मतदार संघावर युतीचे उमेदवार सहज विजयी होतील. त्याचबरोबर मुंबई महापालिकेवर देखिल भाजपाचा महापौर विराजमान होऊ शकतो, त्यामुळे मनसेला महायुतीचे दरवाजे खुले करण्यात आले असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600