जिल्हा
शहापूर-मुरबाड मार्गावरील काळू नदीच्या पुलावर भगदाड
शहापूर-मुरबाड मार्गावरील काळू नदीच्या पुलावर भगदाड
फोटो: ठाणे वैभव
दोन वर्षांपूर्वी घाईने केले होते पुलाचे काम
शहापूर: शहापूर-मुरबाड या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या महामार्गावरील काळू नदीच्या पुलावर भगदाड पडल्याचे निदर्शनास आल्याने या पुलाच्या बांधकामाच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यावर कायमस्वरूपाची तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत.
महाराष्ट्र राज्य रस्ते व विकास महामंडळ अर्थात एमएसआरडीसीच्या नियंत्रणाखाली शहापूर-मुरबाड-म्हसा-पाटगाव-कर्जत ५४८ ए या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण व मजबुतीकरण करण्याचे काम आजतागायत सुरु आहे. या मार्गावरील काळू नदीच्या पुलावरील जोड असलेल्या भागातील सिमेंट गळून पडल्याने या पुलावर मोठा खड्डा पडलेला दिसून येत आहे. या भगदाडात एखाद्या वाहनाचे चाक अडकून मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. मुळात हा संपूर्ण रस्ता तयार होतांना कधीही जबाबदार अधिकारी पर्यवेक्षण करताना दिसून आला नसल्याने या रस्त्याच्या दर्जाबाबत साशंकता दिसून येत आहे. दरम्यान या काळू नदीवरील पुलावर पडलेल्या भगदाडाची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत.
मागील आठ वर्षापासून सुरू असलेल्या या महामार्गाच्या कामामुळे स्थानिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. दोन वर्षापूर्वी पावसाळ्याच्या आधी घाईघाईने या पुलाचे काम एमएसआरडीसीने पूर्ण केल्याने या पुलाचा सुरुवातीचा भाग खचला आहे. भविष्यातही या पुलामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती ग्रुप ग्रामपंचायत दहिवलीचे उपसरपंच दत्तात्रय पाटील यांनी व्यक्त केली.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600