जिल्हा
धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले
धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले
फोटो: ठाणे वैभव
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण...
पालघर: तलासरी तालुक्यातील वेवजी येथील लोकभारती संस्थेच्या भारती अकादमी इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी एका हृदयद्रावक घटनेने खळबळ उडाली आहे. शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन शर्यतीत तृतीय क्रमांक पटकावल्यानंतर अवघ्या काही वेळातच एका 15 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. रोशनी गोस्वामी असं त्या विद्यार्थिनीचं नाव आहे.
शर्यत पूर्ण केल्यानंतर आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे या मुलीचा जीव गेल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत असून, या घटनेमुळे सीमावर्ती भागातील उंबरगाव आणि तलासरी तालुक्यात शोककळा पसरली.
शनिवार 3 जानेवारी रोजी तलासरी तालुक्यातील वेवजी सोरठपाडा येथील भारती अकादमीमध्ये मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 10 वी इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या उंबरगाव येथील रोशनी गोस्वामी या विद्यार्थिनीने मोठ्या हिमतीने धावत तिसरा क्रमांक मिळवला. मात्र, विजयाचा आनंद साजरा करण्यापूर्वीच काळाने तिच्यावर झडप घातली. शर्यत संपल्यानंतर तिला प्रचंड धाप लागली होती. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने ती मैदानावर खाली बसली आणि काही क्षणांतच बेशुद्ध पडली. शाळेने तिला तातडीने जवळच्या गुजरात मधील उंबरगाव येथील रुग्णालयात हलवले, मात्र उपचारापूर्वीच तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
या स्पर्धेसाठी शाळेने घोलवड पोलिसांकडून बंदोबस्त मागवला असून यावेळी पोलिस कर्मचारी घटनास्थळी होते. या घटनेनंतर याप्रकरणी घोलवड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600