जिल्हा
डेटिंग अॅपद्वारे खंडणी वसूल करणाऱ्या आरोपींना अटक
भाईंदर: एका महिलेच्या नावाने टिंडर (डेटिंग) ॲपवर मुख्य आरोपी सागर रावलने बनावट प्रोफाइल तयार करून तक्रारदाराशी ओळख निर्माण केली. त्यानंतर आरोपीने महिला साथीदाराच्या सहाय्याने तक्रारदार महिलेला घरी बोलावून चार साथीदारांच्या सहाय्याने मारहाण करून तिच्याकडील दागिने लुटले. याप्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. समांतर शोध घेणाऱ्या खंडणी विरोधी पोलीस पथकाने दोन आरोपींना अटक केली आहे.
महिलेच्या नांवाने डेटिंग ॲप सुरू करुन चॅटिंगद्वारे तक्रारदार महिलेची ओळख करीत चॅटिंगद्वारे त्याने ओळख झालेल्या महिलेला कॉफी पिण्याच्या बहाण्याने जेपी नॉर्थ येथील बरिस्ता कॉफी सेंटरमध्ये बोलावले. तिथे आरोपी सागरच्या एका महिला साथीदाराने तक्रारदाराला भेटून ती घरी एकटी असल्याचे सांगितले आणि ती चांगली मसाज करते असेही सांगितले. या बहाण्याने ती तक्रारदाराला तिच्या घरी घेऊन गेली. घरी मसाजच्या नावाखाली तक्रारदाराला कपडे काढण्यास सांगण्यात आले. त्याच वेळी महिला आरोपीचे आणखी चार अज्ञात साथीदार तिथे आले आणि त्यांनी तक्रारदाराला बदनामी करण्याची धमकी देऊन मानसिक त्रास दिला.
तक्रारदाराला घरात कोंडून ठेवण्यात आले आणि मारहाण, शिवीगाळ करीत धमकी देण्यात आली. तसेच, तिच्या गळ्यातील सोन्याची साखळी जबरदस्तीने काढून तिच्या ओळखीच्या एका ज्वेलर्सकडे पाठवण्यात आली आणि तिच्याकडून ३,४५,००० रुपये काढून घेण्यात आले. या घटनेच्या तक्रारीवरून काशिमीरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडून समांतरपणे केला जात होता. तक्रारदाराच्या मोबाईल आणि गुप्तचर माहितीच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे, दोन मुख्य आरोपी सागर रावल (२६) आणि ऋषभ शिंदे यांना अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान, त्यांनी इतर साथीदार पाजी, सोनू शेख आणि एक महिला आरोपीसह गुन्हा केल्याची कबुली दिली. अटक केलेल्या आरोपींकडून एकूण एक लाख ४८ हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. पुढील तपासासाठी दोन्ही आरोपींना काशिमीरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600