जिल्हा
वकिली हा केवळ आर्थिक लाभ नव्हे, तर न्यायाचे कार्य
वकिली हा केवळ आर्थिक लाभ नव्हे, तर न्यायाचे कार्य
फोटो: ठाणे वैभव
* ‘दृष्टि २०२५’मध्ये माजी मुख्य न्यायमूर्ती अभय ओक यांचे प्रतिपादन
* वावीकर आय इन्स्टिट्यूट व 'ठाणेवैभव' यांचा संयुक्त उपक्रम
ठाणे : वकिली हा केवळ आर्थिक लाभ मिळवण्याचा व्यवसाय नसून, समाजातील निष्पाप व्यक्तींना न्याय मिळवून देण्याचे एक पवित्र सामाजिक कार्य आहे, असे ठाम मत माजी मुख्य न्यायमूर्ती अभय ओक यांनी व्यक्त केले.
वावीकर आय इन्स्टिट्यूट आणि ‘ठाणेवैभव’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘दृष्टि २०२५’ या भव्य करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांना 'वकिली पेशाचे वास्तव, आव्हाने आणि संधी' यावर सखोल मार्गदर्शन केले.
अभय ओक यांनी आपल्या भाषणात वकिली व्यवसायाच्या इतिहासाचा उल्लेख करताना सांगितले की, ब्रिटिश काळात वकिली हा पेशा प्रामुख्याने प्रतिष्ठित व्यक्ती समाजसेवेच्या भावनेतून करत असत. त्या काळात वकिलांच्या गाऊनला मागे एक खिसा असे. खटला पूर्ण झाल्यावर सामान्य लोक त्यात आपल्या ऐपतीप्रमाणे पैसे किंवा चिल्लर टाकत. काळानुसार वकिलांच्या फीमध्ये वाढ होत गेली आणि त्या खिशाचे अस्तित्वच हळूहळू नाहीसे झाले, असे त्यांनी मिश्कील शैलीत सांगितले. आज वकिली व्यवसायाकडे केवळ पैशाच्या दृष्टीने पाहिले जाते; मात्र प्रत्यक्षात हा पेशा अत्यंत मेहनतीचा, अभ्यासपूर्ण आणि आव्हानात्मक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. वकिली हा २४ तास कार्यरत राहणारा व्यवसाय असून, अर्जंट प्रकरणांमध्ये कोणत्याही वेळी न्यायालयात हजर राहावे लागते, असे त्यांनी नमूद केले.
तरुणांना मार्गदर्शन करताना अभय ओक म्हणाले की, वकिली क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी संयम, कष्ट आणि सातत्य अत्यंत महत्त्वाचे आहे. तालुका, जिल्हा आणि महानगर न्यायालयांमध्ये तरुण वकिलांसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. वकिलांनी रोजच्या घडामोडी, देशातील गुन्हेगारी आणि सामाजिक प्रश्नांची माहिती ठेवण्यासाठी नियमितपणे वृत्तपत्र वाचणे आवश्यक आहे. स्वतः आपण मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांतील वर्तमानपत्रे दररोज वाचतो, असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर येथे तीन जागतिक दर्जाच्या लॉ स्कूल्स असून, येथे पाच वर्षांचे विधी शिक्षण घेता येते. सीएलएटी (CLAT) परीक्षेची तयारी किमान दोन वर्षे गांभीर्याने करणे गरजेचे असून, बहुतेक राष्ट्रीय विधी महाविद्यालयांची फी मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना परवडणारी आहे. काही महाविद्यालयांमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात, अशी माहितीही त्यांनी दिली.
चित्रपटांमध्ये दाखवले जाणारे न्यायाधीश शिस्तप्रिय आणि कडक स्वभावाचे असले, तरी प्रत्यक्षात तेही समाजाची जाणीव असलेले संवेदनशील व्यक्ती असतात. त्यांच्या निर्णयांचा समाजावर परिणाम होत असल्याने न्याय देताना समाजहिताचा विचार करणे आवश्यक असते, असे अभय ओक यांनी स्पष्ट केले. महिलांनीही निर्भयपणे न्यायाधीश किंवा वकील म्हणून करिअर करावे; २४ ते २६ व्या वर्षी त्या न्यायसेवेत प्रवेश करू शकतात, असे त्यांनी सांगितले. आजच्या काळात शिक्षक आणि पालकांनी विद्यार्थ्यांना वकिली पेशाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्यास प्रवृत्त करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांना जर कायद्याची आवड असेल, तर त्यांना प्रोत्साहन देणे आणि योग्य मार्गदर्शन करणे अत्यंत आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले.
हा प्रेरणादायी करिअर मार्गदर्शन कार्यक्रम ६ व ७ डिसेंबर रोजी माजिवडा, ठाणे पश्चिम येथील वावीकर आय इन्स्टिट्यूटच्या भव्य ऑडिटोरियममध्ये उत्साहात पार पडला. यावेळी वावीकर आय इन्स्टिट्यूटचे डॉ. चंद्रशेखर वावीकर, डॉ. वैशाली वावीकर, डॉ. गार्गी वावीकर, सरस्वती विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा मीरा कोर्डे, ‘ठाणेवैभव’चे संपादक मिलिंद बल्लाळ आणि व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600