जिल्हा
यंदा मतदान केंद्रांसाठी गृहसंकुलांना वगळले
शाळा, प्रशासकीय इमारतींमध्ये उभारणार सुविधा
ठाणे: मतदान प्रक्रीया कोणत्याही उमेदवार किंवा कार्यकर्त्यांच्या प्रभावात होऊ नये यासाठी यंदा मतदान केंद्रांसाठी गृहसंकुलांना वगळण्यात आले असून या सुविधा शाळा आणि प्रशासकीय कार्यालयांमध्येच देण्यात येणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ठाणे महापालिका हद्दीतील ३३ प्रभागांमध्ये सुमारे ५०० ठिकाणे यासाठी निश्चित करण्यात आली असून मतदान केंद्रांची संख्या २१००च्या घरात पोहचण्याची शक्यता आहे.
१३१ नगरसेवक पदांसाठी होणार्या या निवडणुकीत विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष अशा उमेदरांची संख्या पाच ते दहा पट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे उमेदवार किंवा त्यांचे नातेवाईक, कार्यकर्ते राहत असलेल्या गृहसंकुले, इमारतींमध्ये मतदान केंद्र उभारल्यास त्यांच्या प्रभावाखाली मतदान होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अशा इमारती, रहिवासी सोसायट्यांची छाननी करणेही शक्य नाही. त्यामुळे सरसकट सर्वच सोसायट्यांना मतदान केंद्रांच्या यादीतून वगळण्यात आले असून शाळा, महाविद्यालय, शासकीय इमारतींमध्ये मतदान केंद्रे उभारण्यात येत असल्याचे निवडणूक अधिकार्यांनी सांगितले.
ज्या प्रभागामध्ये मतदार जास्त असतील तेथे मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात येणार आहे. त्यानुसार बाळकुम, मानपाडा येथील प्रभागांमध्ये मतदान केंद्रे सर्वाधिक असण्याची शक्यता आहे.
८०० ते ९०० मतदारांसाठी एक केंद्र
हरकती सुचनांनंतर प्रशासनाने मतदारांची अंतीम यादी जाहिर केली असून त्यानुसार सुमारे १६ लाख ४९ हजारांच्या पुढे मतदार आहेत. प्रभागनिहाय मतदारांच्या संख्येनुसार मतदार केंद्र निश्चित केले जात आहे. सुमारे ८०० ते ९०० मतदारांसाठी एक केंद्र असे प्रशासनाचे नियोजन आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600