जिल्हा
सिडकोतर्फे उरण तालुक्यातील प्रकल्पबाधितांना ९८ भूखंडवाटप
सिडकोतर्फे उरण तालुक्यातील प्रकल्पबाधितांना ९८ भूखंडवाटप
फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई: सिडको संचालक मंडळाच्या २५ सप्टेंबर २०२५ रोजी पार पडलेल्या बैठकीमध्ये उरण तालुक्यातील नवी मुंबई प्रकल्पबाधितांना १२.५टक्के योजनेंतर्गत, संगणकीय सोडतीद्वारे ७९,२१० चौ.मी. क्षेत्राच्या एकूण ९८ भूखंडांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी असिम कुमार गुप्ता, अपर मुख्य सचिव, विजय सिंघल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको यांसह इतर संचालक आणि सिडकोतील अधिकारी उपस्थित होते.
सिडकोतर्फे नवी मुंबई प्रकल्पासाठी ठाणे, पनवेल व उरण तालुक्यांतील खाजगी जमीन वेळोवेळी संपादित करण्यात आली आहे. संपादित जमिनीच्या बदल्यात जमीन मालकांना १२.५टक्के योजनेंतर्गत विकसित भूखंडांचे वाटप करण्यात येते. नुकतेच सिडको संचालक मंडळाच्या ११ जून २०२५ रोजी झालेल्या बैठकीमध्ये द्रोणागिरी नोडमधील ३१९ भूधारकांना १९ हेक्टर क्षेत्राच्या भूखंडांचे वाटप करण्यात आले होते. उरण तालुक्यातील भूखंडधारकांना वेळोवेळी १२.५% योजनेतील भूखंडांचे वाटप करण्यात आले होते. परंतु, कांदळवन, सीआरझेड, पाणथळ जमिनी, असंपादित जमिनी, अतिक्रमण इ. तांत्रिक कारणांमुळे उर्वरित भूखंडधारकांचे वाटप बाकी होते.
२५ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत ७९,२१० चौ.मी. क्षेत्राच्या एकूण ९८ भूखंडांचे वाटप करण्यात आले. २०११ सालापासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावण्यास सिडको महामंडळास यश आले आहे. लवकरच या भूखंडांवर पायाभूत सुविधांची कामे सुरू करण्यात येणार असल्याचे सिडकोतर्फे कळविण्यात आले आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600