जिल्हा

नाट्य मंदिरामुळे अंबरनाथला नवी ओळख - एकनाथ शिंदे

नाट्य मंदिरामुळे अंबरनाथला नवी ओळख - एकनाथ शिंदे
नाट्य मंदिरामुळे अंबरनाथला नवी ओळख - एकनाथ शिंदे फोटो: ठाणे वैभव
धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिराचे शानदार सोहळ्यात लोकार्पण अंबरनाथ: अंबरनाथचे पुरातन शिवमंदिर श्रद्धेचे तर धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिर कलेचे मंदिर म्हणून त्याची ख्याती होईल. नाट्यमंदिरामुळे अंबरनाथवासियांची सांस्कृतिक भूक भागविण्यात आल्याचे समाधान वाटते, शहराला नवी ओळख प्राप्त झाल्याचे राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. पद्मश्री आणि ज्येष्ठ कलावंत अशोक सराफ आणि दिग्गज कलावंतांच्या उपस्थितीत नाट्यमंदिराचा शानदार उद्घाटन सोहळा झाला. रसिकांच्या गर्दीने नाट्यमंदिर आज पहिल्याच दिवशी हाऊसफुल्ल झाले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या अथक प्रयत्नातून आणि अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या धर्मवीर आनंद दिघे नाट्यमन्दिराचे लोकार्पण उप मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आज रविवारी (१९ ) ऑक्टोबर रोजी झाले. यावेळी ज्येष्ठ चित्रपट निर्माते महेश कोठारे, मकरंद अनासपूरे, अविनाश पाटकर, सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, विजय गोखले, अलका कुबल, उषा नाडकर्णी, संतोष जुवेकर, अशोक समेळ आदी दिग्गज कलाकार यांच्या उपस्थितीत नाट्यमन्दिराचे उद्घाटन झाले. शहराचा विकास करताना विरोधकांचे देखील कायम सहकार्य मिळाल्याने शहराचा विकास होऊ शकला, शहरात झालेल्या विविध लोकोपयोगी विकास कामांचा एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे हे दोघेही कायम कलाकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहायचे. कलाकारांमध्ये आनंद फुलवण्याचे काम आनंद दिघे यांनी केले. अशोक सराफ म्हणजे चालते बोलते विद्यापीठ आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अशोक सराफ यांच्या कार्याचा गौरव केला. अशोक सराफ यांचे छातीत दुखते ह्या नाटकाच्या आधारे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला. राज्यभर केलेल्या विकास कामांमुळे पोटदुखीचा त्रास हाऊ लागला आहे, कायम रडगाणे गातात, त्यांच्यासाठी नाट्यमंदिरात क्रायरूमची व्यवस्था केली आहे. पूर्वी भाऊबंदकी नाटक खूप गाजले होते. आता मनोमिलन नाटकाचा प्रयोग सुरु आहे, असा टोला मंत्री शिंदे यांनी उद्धव आणि राज ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. नाट्यगृहासाठी निधी उपलब्ध करून दिला. खासदार डॉ. शिंदे आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी नाट्यमंदिरासाठी मेहनत घेतली आणि त्यातून अप्रतिम कलाकृती साकारली असल्याचे उप मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. आरोपांना मी कामाने उत्तरे देतो, असा टोलाही त्यांनी लगावला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रास्ताविक केले. अंबरनाथला नाट्यगृहाची गरज होती ती आता पूर्ण झाली आहे नाट्यमंदिरांची स्वच्छता राखली गेली पाहिजे अशी गरज अशोक सराफ यांनी व्यक्त केली. चांगली नाटके सादर करा, रसिकांनी नाटकांना प्रोत्साहन देण्याची गरज सराफ यांनी व्यक्त केली. अंबरनाथला नाट्यमंदिर व्हावे अशी जुनी मागणी पूर्ण झाल्याने हक्काचे घर मिळाल्याचे अशोक समेळ यांनी स्पष्ट केले. मकरंद अनासपुरे, महेश कोठारे, सिद्धार्थ जाधव, विशाखा सुभेदार, अलका कुबल, उषा नाडकर्णी, अशोक पत्की, आदींची यावेळी भाषणे झाली. आमदार डॉ. बालाजी किणीकर, शहरप्रमुख अरविंद वाळेकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, आदींची भाषणे झाली. नाट्यमंदिराच्या रंगमंचाला ज्येष्ठ नाट्यकर्मी बाळ कोल्हटकर यांचे नाव देण्यात आले तर नाट्यमन्दिराच्या प्रांगणात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. पालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी आभार मानले.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600