जिल्हा
अंबरनाथचे चिखलोली धरण ओव्हर फ्लो
अंबरनाथचे चिखलोली धरण ओव्हर फ्लो
फोटो: ठाणे वैभव
अंबरनाथ : यंदा जून महिना पावसाविना गेला असला तरी जुलै महिन्यात आणि त्यातही गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टींमुळे अंबरनाथच्या पूर्वेकडील काही भागाला पाणीपुरवठा करणारे चिखलोली धरण आज भरून वाहू लागल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाली आहे.
अंबरनाथच्या पूर्व भागात असलेल्या चिखलोली धरणातील पाणीसाठा घटल्याने तळ गाठला होता. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने 29 मे 2026 पासून आधी आठवड्यातील दर शुक्रवारी आणि त्यानंतर 15 जूनपासून आठवड्यातून दोन दिवस पाणी कपात लागू केली होती. तसेच एमआयडीसीतर्फे देखील काही भागातील पाणीपुरवठा एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आल्याने पूर्वेकडील महालक्ष्मीनगर, शिवाजीनगर, वडवली, नवरेनगर, मोरीवली पाडा आदी ठिकाणच्या रहिवाशांना पाणीकपातीचा सामना करावा लागला होता. या भागातील अंदाजे 50 ते 60 हजार लोकवस्तीला दररोज सहा एमएलडी पाणी पुरवठा केला जातो.
मागील वर्षी 2025 साली मे महिन्यापासूनच पावसाला सुरुवात झाल्याने त्यावेळी चिखलोली धरण 26 जून रोजीच भरून वाहू लागले होते. यंदा उशिरा सुरू झालेला पण मागील आठवड्यापासून सतत कोसळणाऱ्या पावसाने कसर भरून निघाली असून धरण तुडुंब भरून वाहू लागले. त्यामुळे पाणी कपात रद्द करण्यात आल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण खात्याने कळवले आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600