जिल्हा
उपमुख्यमंत्र्यांच्या आढाव्यात आपत्ती व्यवस्थापन नापास !
उपमुख्यमंत्र्यांच्या आढाव्यात आपत्ती व्यवस्थापन नापास !
फोटो: ठाणे वैभव
* सहायक आयुक्तांचा पदभार काढला
* व्यवस्थापन अधिकाऱ्याला कामकाज सुधारण्याची नोटीस
ठाणे : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाला भेट देऊन शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी विभागाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सहायक आयुक्त राजेश सोनवणे यांच्याकडून या विभागाचा पदभार काढून घेतला तर आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी यांना खडसावत कामकाजात सुधारणा करण्याबाबत नोटीस बजावली.
ताशी 80 ते 90 कि.मी पेक्षा वेगाने वाहणारे वारे आणि जोरदार अतिवृष्टीमुळे शहरात शेकडो झाडे व फांद्या पडल्या आहेत. पडलेली झाडे, फांद्या आणि छाटणी केलेल्या फांद्या रस्त्यावरच पडलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्र्यांनी आपत्कालीन कक्षाला भेट दिली. या भेटीत त्यांनी तातडीने सर्व झाडांचे शास्त्रोक्त पध्दतीने ऑडिट करण्याचे निर्देश आयुक्तांना दिले. संबंधित झाडांची शेवटची छाटणी (ट्रिमिंग) कधी करण्यात आली होती, झाडांची स्थिती काय होती आणि कोणत्या कारणांमुळे ती पडली याचा सखोल अभ्यास करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
यावेळी श्री. शिंदे यांनी अधिकाऱ्यांचीही झाडाझडती घेतली. त्यानंतर आयुक्तांनी तत्काळ कारवाई करत सहायक आयुक्त राजेश सोनावणे यांच्याकडे असलेला वृक्ष अधिकारी या पदाचा कार्यभार काढून घेतला. हा पदभार उद्यान अधीक्षक केदार पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी यांना कामकाजात सुधारणा करणेबाबत नोटीस बजावण्यात आली आहे.
शहरात पडलेल्या झाडांच्या फांद्या तातडीने हटविण्यासाठी महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या हायड्रा, लिफ्टिंग मशीन आणि अन्य यंत्रसामग्रीचा वापर करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार अतिरिक्त यंत्रसामग्री भाडेतत्त्वावर उपलब्ध करून घेण्याचेही निर्देश त्यांनी आयुक्तांना दिले.
भविष्यात झाडे पडण्याच्या घटना रोखण्यासाठी शहरातील सर्व झाडांचे शास्त्रोक्त पद्धतीने ऑडिट करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी शहरातील पाणी साचणाऱ्या सखल भागांचा आढावा त्यांनी घेतला. ठाणे शहरातील सखल भागात 84 ठिकाणी पंप बसविण्यात आले असून त्या पंपांचे नियंत्रण आणि देखरेख आपत्ती व्यवस्थापन कक्षातून सातत्याने करण्यात येत आहे.
पावसाळ्याच्या काळात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा देत संबंधित अधिकारी, वृक्ष प्राधिकरण विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग, तसेच इतर संबंधित यंत्रणांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान केला जाईल, तर निष्काळजी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले. ठाणे शहरात वृक्ष अंगावर पडून जखमी झालेल्या नागरिकांवर तातडीने उपचार होण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश आयुक्तांना दिले.
यावेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, मधुकर बोडके, उपनगरअभियंता शुभांगी केसवानी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी, वरिष्ठ उद्यान अधीक्षक केदार पाटील, शिवसेना गटनेते पवन कदम, नगरसेवक राम रेपाळे, रमाकांत मढवी, राजेश मोरे, विकास रेपाळे, नगरसेविका नम्रता भोसले आदी उपस्थित होते.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600