जिल्हा
डहाणू शहरात दिवसाढवळ्या ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा
डहाणू शहरात दिवसाढवळ्या ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा
फोटो: ठाणे वैभव
सिने स्टाईलने गोळीबार करून दरोडेखोर फरार
डहाणू: पालघर जिल्ह्यातील डहाणू शहरात सोमवार २० जुलै रोजी दुपारी ४.३०च्या सुमारास एका नामांकित ज्वेलर्सच्या दुकानात सशस्त्र दरोडा पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशा धाडसी पद्धतीने शहरातील वर्दळीच्या ठिकाणी इराणी रोड परिसरात हा प्रकार घडला असून दरोडेखोरांनी यावेळी गोळीबार केल्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार इराणी रोडवरील ‘लक्ष्मी ज्वेलर्स’ या दुकानात मोटारसायकलवरून आलेल्या तीन अज्ञात दरोडेखोरांनी प्रवेश केला. त्यांनी शस्त्राचा धाक दाखवून दुकानातील दागिने व रोकड लुटली. हा दरोडा भरदिवसा, एखाद्या फिल्मी स्टाईलने आणि शहरातील मुख्य बाजारपेठेत पडल्यामुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
घटनेची माहिती मिळताच डहाणू पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दुचाकीवरून पळून जाणाऱ्या दरोडेखोरांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी ठरले. शहराच्या मध्यवर्ती भागात झालेल्या या धाडसी दरोड्यामुळे स्थानिक कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600