जिल्हा

चंदीगड-मनाली-लेह-खारदुंगला सायकल मोहीम यशस्वी

चंदीगड-मनाली-लेह-खारदुंगला सायकल मोहीम यशस्वी
चंदीगड-मनाली-लेह-खारदुंगला सायकल मोहीम यशस्वी फोटो: ठाणे वैभव
ठाणे: खासगी संस्थांकडून साधारण ६० ते ६५ हजार रुपये खर्च अपेक्षित असणारी चंदीगड-मनाली-लेह-खारदुंगला सायकल मोहीम मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर येथील ११ वरिष्ठ सायकलपटूंनी उत्कृष्ट नियोजनाच्या बळावर अवघ्या ३० हजार रुपयांत यशस्वीरीत्या पूर्ण केली. मुंबईचे वरिष्ठ सायकलपटू सतीश जाधव यांच्या नेतृत्वाखाली नवनीत वरळीकर, जितेंद्र जैन तर ठाण्याचे सुवर्णा अडसुळे, धनंजय तेलगोटे तसेच नागपूरचे विश्वास चाटी, उदय पानवलकर, दिलीप बिरे, आणि पुण्याचे अरुण नेवसे, विजयकुमार सरजीने यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. तर अतुल ओझा यांनी मदतनीस म्हणून जबाबदारी सांभाळली. या मोहिमेची तयारी तब्बल चार महिने सुरू होती. सायकलवर १० किलो वजन घेऊन घाटाचा सराव, आठवड्यातून १०० कि.मी. सायकलिंग, प्राणायाम, ध्यानधारणा आणि उच्च उंचीवरील विरळ प्राणवायूशी जुळवून घेण्यासाठी आवश्यक शारीरिक तयारी करण्यात आली. हिमालयातील १२ हजार फूटांपेक्षा अधिक उंचीवर होणाऱ्या ॲक्युट माउंटन सिकनेसचा धोका लक्षात घेऊन ही तयारी करण्यात आली होती. रेल्वे प्रवासात सायकलींचे नुकसान होऊ नये म्हणून प्रत्येकासाठी विशेष सायकल बॅग तयार करण्यात आली होती. त्यामुळे मुंबई ते चंदीगड हा प्रवास २ एसी डब्यात सायकली सुरक्षितपणे सोबत नेता आल्या. चंदीगड येथे २० सीटर टेम्पो ट्रॅव्हलरची व्यवस्था करण्यात आली होती. बसमधील मागील सात आसने काढून टाकल्याने ११ डिस्मेंटल केलेल्या सायकली व सर्व साहित्य सहज मावले. मनाली येथे पोहोचल्यानंतर सायकली पुन्हा जोडून त्यांची फाइन ट्युनिंग करण्यात आल्या. त्यानंतर नग्गर पॅलेसपर्यंत २५ किमीची ॲक्लायमटायझेशन राईड करून उंचीशी शरीर जुळवून घेण्याचा सराव करण्यात आला. ४ जुलैपासून प्रत्यक्ष मनाली-लेह-खारदुंगला सायकल मोहीमेची सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी मनाली ते मढी हा कठीण चढ पार करून सायकलपटूंनी पहिला मुक्काम टेंटमध्ये केला. पुढील प्रवासात रोहतांग पास, बारालाचा-ला, नकिला, लाचुग-ला, टांगलंग-ला आणि अखेरीस जगातील सर्वाधिक प्रसिद्ध मोटरेबल खिंडींपैकी एक असलेल्या खारदुंगला पास यशस्वीरीत्या सर करण्यात आले. या संपूर्ण मोहिमेत सिसू, जिस्पा, झिंग झिंग बार, सरचू, व्हिस्की नाला, देबरिंग, रुमत्से आणि लेह अशा टप्प्यांमधून सायकल सफर करण्यात आली. अनेक ठिकाणी टेंटमध्ये मुक्काम करत गॅस शेगडीवर चहा, सूप, मॅगी, डाळ-खिचडी, कांदा भजी, पुलाव, दलिया, पोहे, सत्तू आदी पदार्थ स्वतः तयार करून खर्चात मोठी बचत करण्यात आली. लेहहून परतीचा प्रवास टेम्पो ट्रॅव्हलरने करण्यात आला. चंदीगड रेल्वे स्थानकावर सर्व साहित्य स्वतः प्लॅटफॉर्मवर नेऊन ठेवण्यात आले. विशेष सायकल बॅगचा वापर केल्यामुळे सायकली लगेज व्हॅनमध्ये न देता रेल्वे डब्यात सुरक्षितपणे आणता आल्या आणि लगेज शुल्काचाही खर्च वाचला. संपूर्ण मोहिमेचा खर्च प्रत्येक सहभागीसाठी केवळ ३० हजार रुपये इतका झाला. याच खर्चात सपोर्ट व्हेईकल, निवास, जर्सी, टी-शर्ट, बॅनर आणि सहभाग प्रमाणपत्र यांचाही समावेश होता. कमी खर्चात, स्वयंपूर्ण नियोजन आणि परस्पर सहकार्याच्या बळावर हिमालयीन सायकल मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण करता येते, हे या मोहिमेने सिद्ध करून दाखवले. या मोहिमेच्या नियोजनासाठी विशांत नवार, नेहा नवार, महेंद्र निकम, आशिष आरोस्कर आणि कुणाल धोत्रे तर ठाण्याचे मयुरेश डोळस, आदित्य दास, गोपाळ साबे, प्रज्ञा म्हात्रे, यांचे विशेष सहकार्य लाभले.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600