जिल्हा
'कचरा हस्तांतरण'ची कुणकुण लागताच रहिवासी आक्रमक
'कचरा हस्तांतरण'ची कुणकुण लागताच रहिवासी आक्रमक
फोटो: ठाणे वैभव
* मुल्लाबागमध्ये कचरा गाड्या उतरताच नागरिक आक्रमक
* महापालिकेच्या पथकाला रोखले
ठाणे: प्रभागनिहाय कचरा हस्तांतरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला असला तरी रहिवासी भागात त्यास विरोध करण्याची भूमिका नागरिकांनी घेतली आहे. महापालिका अधिकाऱ्यांचे पथक मुल्लाबाग येथील नियोजित केंद्राच्या ठिकाणी गेले असता येथील रहिवाशांनी आक्रमक होत विरोध केला. अधिकाऱ्यांनी मात्र दगडफेक झाल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे सी पी.तलावपाठोपाठ आता मुल्लाबाग येथेही कचरा प्रश्न पेटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
वागळे इस्टेट येथील सीपी तलाव परिसरात ठाणे महापालिकेचे कचरा हस्तांतरण केंद्र होते. या केंद्रावर मोठ्या प्रमाणात कचरा साचू लागला होता. त्यामुळे कचरा हस्तांतरण केंद्राची अवस्था कचरा भूमीप्रमाणे झाली होती. हा प्रकल्प हटविण्याची मागणी येथील रहिवाशांकडून केली जात होती. नागरिकांनी प्रचंड विरोध केल्यानंतर तसेच शिंदे गटाने महापालिकेच्या कचरा वाहून नेणाऱ्या गाड्या फोडण्याचा इशारा दिल्यानंतर ठाणे महापालिकेने येथून कचरा हस्तांतरण बंद केले. परंतु आता रस्त्यावर ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
मुल्लाबाग परिसरात महापालिकेचे पथक प्रायोगिक स्तरावर कचरा हस्तांरण केंद्र तयार करण्यासाठी गेले होते. मुल्लाबाग परिसरात मोठ्या प्रमाणात रहिवास क्षेत्र आहे. महापालिकेचे पथक आल्याची माहिती येथील नागरिकांना मिळाल्यानंतर राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि रहिवासी त्या ठिकाणी गेले. त्यांनी पथकाला विरोध करण्यास सुरुवात केली. येथे दगडफेक झाल्याचा आरोप देखील महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. एका व्यक्तीने जेसीबीच्या समोर झोपण्याचा प्रयत्न केला. अखेर प्रचंड विरोधानंतर महापालिकेचे पथक तेथून निघून गेले.
येथे रहिवासी क्षेत्र आहे. ज्येष्ठ नागरिक, लहान बालके प्रत्येकाच्या घरामध्ये आहेत. कचरा हस्तांतरण केंद्र झाल्यास नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी रहिवाशांची कोणतीही बैठक घेतली नसल्याचा दावा स्थानिकांनी केला.
याच परिसरातील नागरिकांच्या कचऱ्यासाठी हस्तांतरण केंद्र प्रस्तावित केला होता. त्याला मोठ्या प्रमाणात विरोध करुन बंद पाडण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक चार या भागाचाच कचरा येथे येणार होता, त्यामुळे हा विरोध योग्य नाही. ठाणे शहरातील प्रत्येक प्रभाग समितीने त्यांच्या कचऱ्याची जबाबदारी स्विकारली आहे. ही जागा महापालिकेच्या मालकीची जागा आहे. त्यांचाच कचरा जर त्यांच्या भागात येणार नसेल तर मग त्यांचा कचरा जाणार कुठे हे देखील नागरिकांनी समजून घेतले पाहिजे. नागरिकांकडून विरोध होत असला तरी प्रभाग समितीनिहाय हस्तांतरण केंद्र सुरू करणार आहोत, असे महापालिका उपायुक्त मनीष जोशी यांनी सांगितले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600