जिल्हा
आष्टे शाळेचा शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात दबदबा
आष्टे शाळेचा शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात दबदबा
फोटो: ठाणे वैभव
प्रथम-द्वितीय क्रमांकासह १० विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक
शहापूर : शहापूर तालुक्यातील ठुणे केंद्रातील आष्टे जिल्हा परिषद प्राथमिक शाळाने पूर्व उच्च प्राथमिक शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ इयत्ता पाचवीमध्ये घवघवीत यश संपादन करत ठाणे जिल्ह्यात आपला दबदबा कायम राखला आहे.
जिल्ह्यात प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावत तब्बल दहा विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरल्याने आष्टे शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पुन्हा एकदा राज्यपातळीवर दखल घेण्यासारखी कामगिरी झाली आहे. या परीक्षेत जितेंद्र करण याने ३०० पैकी २७२ गुण मिळवत ठाणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला, तर आर्यन वरकुटे याने २५८ गुणांसह जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवून शाळेच्या यशात मानाचा तुरा रोवला. या दोन्ही विद्यार्थ्यांच्या यशामुळे आष्टे गावासह संपूर्ण शहापूर तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय युवराज विशे (२२६), पवन मोंडुळा (२१०), केतन वेखंडे (१९८), प्रणव सपाट (१९०), तनुष्का सपाट (१८६), निधी करण (१८०), प्रचिती विशे (१७८) आणि दिया करण (१७०) हे विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले. तसेच प्राची विशे हिने १६० गुण मिळवत पात्रता प्राप्त केली.
या यशामागे विद्यार्थ्यांची जिद्द, शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि शिक्षण विभागाचे प्रभावी नियोजन महत्त्वाचे ठरले. गटशिक्षणाधिकारी हिराजी वेखंडे, विस्तार अधिकारी शिवानी पवार तसेच केंद्रप्रमुख डॉ. विलास वेखंडे यांनी वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळाली. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी आदिवासी उन्नती मंडळ, मुंबई, नॉलेज अकॅडमी शहापूर, जाणीव प्रतिष्ठान शहापूर, शिक्षक नेते स्व.काशिनाथ भोईर प्रतिष्ठान, दीपस्तंभ प्रतिष्ठान शहापूर, फँड्री फाउंडेशन, सेवा सहयोग संस्था मुंबई, श्री सत्यसाई सेवा समिती तलवाडे, वेदांत केबल अँड नेटवर्क, शाळा व्यवस्थापन समिती आष्टे आणि ग्रामस्थ मंडळ आष्टे यांनी दिलेले सहकार्यही मोलाचे ठरले. सलग गुणवत्तापूर्ण निकालांची परंपरा कायम राखणाऱ्या आष्टे शाळेने ग्रामीण भागातील सरकारी शाळाही योग्य नियोजन, सक्षम शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीच्या जोरावर सर्वोच्च यश संपादन करू शकतात, हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल गुणवंत विद्यार्थी, पालक, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600