जिल्हा

शहापूर तालुक्यात मुसळधार; तिन्ही धरणांना दिलासा

शहापूर तालुक्यात मुसळधार; तिन्ही धरणांना दिलासा
शहापूर तालुक्यात मुसळधार; तिन्ही धरणांना दिलासा फोटो: ठाणे वैभव
भातसा नदी वाहू लागली दुथडी भरून शहापूर: शहापूर तालुक्यासह धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे भातसा, तानसा आणि मोडकसागर धरणांतील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होऊ लागली आहे. विशेष म्हणजे भातसा नदी दुथडी भरून वाहू लागल्याने नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी कार्यालय, ठाणे यांच्या जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भातसा धरणाची एकूण संकल्पित साठवण क्षमता ९४२.१० दशलक्ष घनमीटर असून, सध्या त्यात ३२६.६३ दशलक्ष घनमीटर म्हणजे ३४.६७ टक्के जलसाठा आहे. मागील काही दिवसांच्या तुलनेत हा साठा वाढल्याचे दिसून येत आहे. तानसा धरणातही पावसामुळे चांगली भर पडली आहे. या धरणाची संकल्पित क्षमता १४५.०८ दशलक्ष घनमीटर असून, सध्या २५.१६ दशलक्ष घनमीटर म्हणजे १७.३४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. काही दिवसांपूर्वी अत्यल्प असलेला साठा आता वाढीच्या दिशेने वाटचाल करत आहे. मोडकसागर धरणातही जलसाठा वाढून ३९.९२ दशलक्ष घनमीटर म्हणजे ३०.९६ टक्के झाला आहे. या धरणाची एकूण क्षमता १२८.९३ दशलक्ष घनमीटर आहे. पालघर जिल्ह्यातील धामणी धरणात ८९.११ दशलक्ष घनमीटर आणि कवडास धरणात ८.२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा नोंदवला गेला आहे. दरम्यान धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भातसा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. शहापूर (सापगाव) येथील नदीची धोक्याची पातळी ३५.५५ मीटर, इशारा पातळी ३६.०६१ मीटर असून, आज नदीची पातळी ३२.४० मीटर इतकी नोंदविण्यात आली आहे. नदीची पातळी धोक्याच्या पातळीपेक्षा अद्याप खाली असली तरी ती सातत्याने वाढत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसही मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे धरणांमध्ये आणखी पाणीसाठा वाढण्याची शक्यता असून, प्रशासनाकडून धरणे, नद्या आणि सखल भागांवर २४ तास नजर ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरणे, पूराच्या पाण्यातून प्रवास करणे टाळावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. धरणांतील जलसाठा भातसा : ३४.६७ टक्के तानसा : १७.३४ टक्के मोडकसागर : ३०.९६ टक्के नद्या वाहू लागल्या दुथडी भरून ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यात उल्हास नदीने बदलापूर येथे १६.८० मीटर पातळी गाठून इशारा पातळी (१६.५० मीटर) ओलांडली असून ती धोक्याच्या पातळीच्या (१७.५० मीटर) दिशेने वाहत आहे. तर अंबरनाथमधीलच जांभूळपाडा येथे उल्हास नदी १३.२० मीटरवर वाहत असून तिने १३.०० मीटरची इशारा पातळी ओलांडली आहे. कल्याण तालुक्यात उल्हास नदी मोहने येथे ८.८३ मीटरवर असून येथील इशारा पातळी ९ मीटर आहे. टिटवाळा येथील काळू नदीने १०२ मीटरची इशारा पातळी गाठली असून शहापूरमधील भातसा नदी ३२.४० मीटरवर (इशारा पातळी ३६.०६ मीटर) वाहत आहे. पालघर जिल्ह्यात मात्र नद्यांची पातळी सध्या नियंत्रणात असून सूर्या नदी (मासवण) ५.५० मीटर, वैतरणा ९८.७० मीटर आणि पिंजाळ नदी ९८.८० मीटर पातळीवर वाहत आहे, ज्यांच्या इशारा पातळी अनुक्रमे ११ मीटर, १०१.९० मीटर आणि १०२.७५ मीटर आहेत.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600