जिल्हा
उल्हासनगर महापालिकेत महापौरपदी अश्विनी निकम
उल्हासनगर महापालिकेत महापौरपदी अश्विनी निकम
फोटो: ठाणे वैभव
उपमहापौरपदी अमर लुंड यांची निवड
उल्हासनगर: तब्बल चार वर्षांच्या प्रदीर्घ प्रशासकीय कालखंडानंतर उल्हासनगर महानगरपालिकेत अखेर लोकनियुक्त नेतृत्वाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. मंगळवारी एका दिमाखदार सोहळ्यात नवनिर्वाचित महापौर अश्विनी निकम आणि उपमहापौर अमर लुंड यांनी अधिकृतपणे आपला पदभार स्वीकारला.
या निर्विरोध निवडीमुळे महापालिकेच्या राजकारणात मोठे स्थैर्य निर्माण झाले असून, गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या शहराच्या विकासाला आता गती मिळेल, अशी ठाम अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल आणि महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिका सभागृहात हा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. शिवसेना (शिंदे गट) यांच्या अश्विनी निकम यांनी महापौर पदाची, तर भारतीय जनता पक्षाच्या अमर लुंड यांनी उपमहापौर पदाची सूत्रे हाती घेतली. यावेळी सभागृहात महापालिकेचे सर्व ७८ नगरसेवक उपस्थित होते. विशेष म्हणजे, या दोन्ही पदांसाठी कोणताही प्रतिस्पर्धी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात न उतरल्याने ही प्रक्रिया पूर्णपणे निर्विरोध पार पडली. कोणत्याही वादाविना सर्वसम्मतीने नवे नेतृत्व निवडून आल्याने सत्ताधारी महायुतीमध्ये समाधानाचे वातावरण असून शहराच्या राजकीय वर्तुळातून या निवडीचे स्वागत होत आहे.
गेल्या चार वर्षांहून अधिक काळ प्रशासकीय सत्तेखाली असलेल्या या शहरात अनेक धोरणात्मक निर्णय आणि नागरी प्रश्न प्रलंबित राहिल्याची चर्चा होती. लोकनियुक्त प्रतिनिधी नसल्याने प्रशासकीय निर्णयांवर मर्यादा येत होत्या; मात्र आता स्थायी नेतृत्व मिळाल्याने पायाभूत सुविधांच्या कामांना वेग मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पदभार स्वीकारताच नवनिर्वाचित महापौरांनी आपली प्राथमिकता स्पष्ट केली असून रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि आरोग्य सेवा यांसारख्या मूलभूत सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे आश्वासन दिले आहे. प्रशासनाशी समन्वय साधून पारदर्शक आणि गतिमान कारभार राबवण्यावर दोन्ही पदाधिकाऱ्यांनी भर दिला आहे.
या ऐतिहासिक क्षणी आपली भावना व्यक्त करताना महापौर अश्विनी निकम म्हणाल्या की, नागरिकांनी दिलेला हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी त्या संपूर्ण निष्ठेने कार्य करतील. चार वर्षांनंतर लोकशाही पद्धतीने सत्तेत आलेल्या या नेतृत्वाकडे शहराच्या भवितव्याची मोठी जबाबदारी असून, सर्व नगरसेवक आणि प्रशासनाला सोबत घेऊन उल्हासनगरला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचा त्यांचा निर्धार आहे. या सत्तापालटामुळे शहरात नवीन चैतन्य पसरले असून, आगामी काळात उल्हासनगरचा चेहरामोहरा बदलण्यासाठी पावले उचलली जातील असा विश्वास व्यक्त होत आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600