जिल्हा
बीसीसीआयचा बाऊन्सर; स्टेडियममधून 'टेनिस' बाद!
बीसीसीआयचा बाऊन्सर; स्टेडियममधून 'टेनिस' बाद!
फोटो: ठाणे वैभव
मान्यता रद्द होण्याच्या भीतीने दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये टेनिस क्रिकेट स्पर्धांना बंदी
ठाणे: बीसीसीआयच्या नियमानुसार दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये बदल करण्यात आले होते. तसेच सिझन क्रिकेटला मान्यता देण्यात आली होती. मात्र या मैदानात टेनिस क्रिकेट स्पर्धाही खेळवण्यात येत असल्याने बीसीसीआयची मैदानाची मान्यता रद्द होण्याची भीती भेडसावू लागल्याने प्रशासनाने यापुढे टेनिस स्पर्धांना बंदी घातली आहे.
दादोजी कोंडदेव स्टेडीयमची पांढरा हत्ती ही ओळख पुसण्यासाठी ठाणे पालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना आखण्यात आल्या. मैदानाचा कायापालट करत या ठिकाणी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट सामने होतील, अशा पद्धतीने या मैदानाच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी खर्च करण्यात आला आहे. तसेच मैदानातील मुख्य खेळपट्टी व आऊट फिल्डचे नुतनीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर येथील मैदानची नोंद बीसीसीआय, एमसीएमार्फत घेण्यात आल्याने येथे फक्त सिझन बॉल क्रिकेट स्पर्धा व सरावाचे आयोजन करणे अशी अट यापूर्वी विभागामार्फत देण्यात आली होती. तरीही मैदानात टेनिस बॉल क्रिकेट खेळण्याच्या प्रस्तावाला २०२३ मध्ये मान्यता देण्यात आली आणि मैदानात टेनिस बॉल स्पर्धांचेच आयोजन अधिक प्रमाणात होत असल्याचे दिसून आले.
दरम्यान, बीसीसीआय, एमसीएमार्फत आयोजित विविध रणजी सामन्यांना प्राधान्य देता येणे शक्य नसल्याचे दिसून आले आहे. तसेच यावर्षी याचा फटका बीसीसीआयच्या महिला क्रिकेट स्पर्धा तसेच अंडर १७ वयोगटातील विजय हजारे या स्पर्धांचे आयोजन करता येणे शक्य झाले नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. तसेच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा होत असल्याने या मैदानाची जास्त झिज होऊन नुकसान होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. तसेच बीसीसीआय, एमसीएने दिलेली मान्यता देखील रद्द होऊ शकते अशी भिती महापालिकेला वाटू लागल्याने अखेर त्यांनी टेनिस क्रिकेट स्पर्धा खेळविण्याचा निर्णय मागे घेतला आहे. त्यामुळे आता या ठिकाणी केवळ सिझन बॉल क्रिकेट स्पर्धा होतील, असा प्रस्ताव पालिका प्रशासनाकडून मंजुर करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600