जिल्हा
ठाण्याकडे पाणी वळविले; कळव्याला ठेवले तहानलेले!
ठाण्याकडे पाणी वळविले; कळव्याला ठेवले तहानलेले!
फोटो: ठाणे वैभव
* पाण्यासाठी कळवेकरांची प्रभाग समितीवर धडक
* प्रभाग समितीसमोर फोडले मडके
ठाणे: ठाणे शहरात पाण्याची टंचाई भासू लागल्यानंतर कळव्याचा पाणीसाठा ठाण्याला वळवण्यात आल्याने कळव्यात मोठ्या प्रमाणात पाणी कपात केली जात आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने प्रभाग समितीवर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी कार्यालयासमोर आंदोलकांनी मडके फोडत प्रशासनाचा निषेध केला.
ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २७ लाख इतकी आहे. शहरासाठी प्रतिदिन ६१६ दशलक्ष लीटर इतका पाण्याचा कोटा मंजुर आहे. प्रत्यक्षात शहराला दररोज ५८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा होतो. त्यामध्ये महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लिटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्ष लीटर, स्टेम कंपनीकडून ११५ दशलक्ष लिटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. ठाणे महापालिका क्षेत्राचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. वाढत्या नागरीकरणाच्या तुलनेत शहरात पुरेसा पाणी पुरवठा होत असल्याचा दावा प्रशासन करत असले तरी शहरात पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे. त्यातच कळव्याला होणारा पाणीपुरवठा आता ठाण्याकडे वळविण्यात आला असल्याने कळवा, खारीगाव, विटावा, डोंगरातील परिसरात सर्वसामान्य जनतेला दैनंदिन जीवनासाठी पुरेल एवढं सुद्धा पाणी ठाणे महापालिकेतर्फे देण्यात येत नाही. तसेच जे पाणी सोडण्यात येत आहे, ते गढूळ स्वरूपाचे आहे, असा आरोप आंदोलकांनी केला.
डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार निघालेल्या या मोर्चात शहराध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिलाध्यक्ष सुजाता घाग, नताशा आव्हाड यांची प्रमुख उपस्थिती तर शेकडो कळवेकर सहभागी झाले होते. या प्रसंगी नताशा आव्हाड यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. एकीकडे ठाण्यात उड्डाणपुलांना रंगरंगोटी करण्यात येत आहे. मात्र, पाण्यासारखी मूलभूत गरज जर ठामपाला भागवता येत नसेल तर कसे होणार? ठाण्यात जास्त पाणी दिले जात असेल आणि कळव्याला पाणी दिले जात नसेल तर फक्त ठाण्यातच माणसे राहतात का? असा सवाल नताशा आव्हाड यांनी उपस्थित केला. ठाण्यात अनधिकृत बांधकामांना द्यायला पाणी आहे. पण, नागरिकांना पायला पाणी नाही, हे खेदजनक आहे, असा संताप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
आंदोलकांनी रिकामे हंडे घेऊन पालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच, प्रभाग समितीसमोर मडके फोडून निषेध केला.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600