जिल्हा
वसई-विरार महापालिका मोहिमेत ११ बोगस डॉक्टरांवर गुन्हा दाखल
भाईंदर: वसई-विरार महापालिकेने आपल्या हद्दीत हाती घेतलेल्या मोहिमेमध्ये महिनाभरात एकूण ११ बोगस डॉक्टरांवर कारवाई केली आहे. या सर्व डॉक्टरांवर विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यामुळे वसईतील बोगस डॉक्टरांची प्रकरणे अजूनही कायम असल्याचे दिसत आहे.
वसई-विरार महापालिका हद्दीत मागील वर्षात चार बोगस डॉक्टरांची प्रकरणे समोर आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा बोगस डॉक्टर सक्रिय झाल्याची माहिती पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाला मिळाली होती. याअनुषंगाने, वैद्यकीय आरोग्य विभागांतर्गत कार्यरत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रात छापे मारुन दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना पालिका उपायुक्त डॉ. विजयकुमार द्वासे आणि प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांनी दिल्या होत्या. त्यानुसार पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता, सुरुवातीच्या १५ दिवसांत तीन बोगस डॉक्टर आढळून आले होते. त्यानंतर आणखी आठ बोगस डॉक्टर आढळले असून त्यांच्यावर वसईतील विविध पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती डॉ. भक्ती चौधरी यांनी दिली.
"बोगस वैद्यकीय व्यवसायिकांना आळा घालण्यासाठी धाडसत्र सुरूच राहणार आहे. वसई-विरार शहर महापालिका कार्यक्षेत्र बोगस डॉक्टरमुक्त करण्याचे आव्हान स्वीकारन वैद्यकीय आरोग्य विभाग कार्यरत राहणार आहे. अवैध वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांपासून सावध राहा आणि बोगस डॉक्टरांची माहिती पालिकेला कळवा, असे आवाहन वसई विरार महापालिकेचे उपायुक्त डॉ. विजयकुमार द्वासे यांनी केले आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600