जिल्हा
खड्डेमुक्त रस्त्यांचे दावे फोल; ठामपाची भरपावसात मलमपट्टी
खड्डेमुक्त रस्त्यांचे दावे फोल; ठामपाची भरपावसात मलमपट्टी
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: रस्त्यांसाठी आणि रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. मात्र पहिल्याच पावसात रस्त्यांची चाळण झाल्याने महापालिकेचा दावा खोटा ठरला आहे. अखेर नागरिकांनी ओरड सुरू केल्यानंतर प्रशासनाने भरपावसात खड्डे बुजवण्यास नेहमीप्रमाणे सुरुवात केली आहे.
कापूरबावडी, माजीवडा आणि वाघबीळ उड्डाणपुलांवर मुसळधार पाऊस आणि अवजड वाहतुकीमुळे मोठे खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचत आहे. वाहनचालकांना पाण्यामुळे या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे. दुचाकीस्वारांसाठी या रस्त्यांवरील प्रवास धोकादायक झाला असून वाहनांचा वेग मंदावून वाहतूक कोंडी होत आहे. कॅडबरी जंक्शन ते नितीन कंपनीदरम्यान उड्डाणपुलावरही अनेक ठिकाणी रस्ता उखडलेला असून नागरिकांच्या तक्रारी आणि वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिकेने रविवारी दुरुस्तीची मोहीम हाती घेतली.
माजिवडा उड्डाणपुलावरील नाशिकहून ठाण्याकडे येणाऱ्या वळणावरील खड्डे, तसेच कापुरबावडी आणि वाघबीळ उड्डाणपुलांवरील खराब झालेला रस्ता मॅस्टिकच्या सहाय्याने दुरुस्त करण्यात येत आहे. आनंदनगर परिसरातील रस्त्यांवरील खड्डेही बुजविण्यात आले आहेत. पुढील टप्प्यात कॅडबरी जंक्शन, नितीन कंपनी आणि तीन हात नाका उड्डाणपुलांवरील खड्ड्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. मात्र, पावसाळा सुरू झाल्यानंतर तातडीने दुरुस्ती करण्याची वेळ आल्याने पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेल्या रस्ते दुरुस्तीच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600