जिल्हा
मुरबाड तालुक्यात अतिवृष्टीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला
मुरबाड तालुक्यात अतिवृष्टीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला
फोटो: ठाणे वैभव
काळू, शाई, कनकविरा, मुरबाडी, डोईफोडी नद्या ओसंडून
मुरबाड: मुरबाड तालुक्यात गेल्या तीन चार दिवसांपासून सुरू असलेल्या धुवांधार पावसाने तालुक्यातील काळू, शाई, कनकविरा, मुरबाडी नदीसह डोईफोडीलाही महापूर आला असून, अनेक ठिकाणी रस्ते वाहतूक बंद होऊन गावांचा संपर्क तुटला आहे.
प्रशासनाच्या वतीने रेड अलर्ट जारी करत धोक्याच्या सूचना देऊन, नदी, नाले, गडकिल्ले, तलाव, धरणे इत्यादी ठिकाणे पुढील आदेश येईपर्यंत प्रतिबंधित क्षेत्रे म्हणून घोषीत करण्यात आली आहेत.
२ जुलैपासून चार दिवस पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने करचोंडे, घोरले, चिखले, चासोळे, येथील पूल पाण्याखाली गेल्याने नागरिकांचा संपर्क तालुक्यापासून तुटला आहे. टोकावडे तळेगाव रस्ता करचोंडे गावाजवळ खचल्याने जडइ, आंबिवली, चासोले, पारधवाडी, कुडशेत, मोहवाडी, झाडघर यांच्यासह 14 गावांचा संपर्क तुटला आहे.
काळू नदी पात्रालगतच्या बुडीत श्रेत्रात येणा-या वाड्या-पाड्यांना मुरबाडचे तहसीलदार अभिजित देशमुख प्रत्यक्ष भेटी देत आहेत. नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करत आहेत. ज्या ठिकाणी नवीन रस्त्यांना तडे गेले आहेत, तेथे त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600