महाराष्ट्र
पावसाळापूर्व कामे युद्धपातळीवर पूर्ण करून घ्या, आयुक्तांचे निर्देश
भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त संजय काटकर यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन तथा मान्सून पूर्व आढावा बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी पावसाळापूर्व कामे युद्धपातळीवर पूर्ण करून घेण्याचे निर्देश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले.
बैठकीस अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, उपायुक्त रवि पवार, उपायुक्त कल्पिता पिंपळे, उपायुक्त सचिन बांगर, शहर अभियंता दिपक खांबित, कार्यकारी अभियंता सहायक आयुक्त प्रभाग समिती क्रमांक १ ते ६, महापालिका अधिकारी, कर्मचारी, वाहतूक पोलीस अधिकारी, नॅशनल हायवे प्रतिनिधी, महानगर गॅस प्रतिनिधी, जे. कुमारचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मान्सून दरम्यान कोणत्याही आपत्कालीन घटना यावर्षी घडू नये यासाठी आधीपासूनच आवश्यक ती दक्षता घेत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावर भर द्यावा, असे निर्देश देत महानगरपालिका आयुक्त संजय काटकर यांनी महानगरपालिका कार्यक्षेत्रात सद्यस्थितीत सुरू असलेली कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी निर्देश दिले. मान्सून २०२४ पावसाळापूर्व तयारीच्या अनुषंगाने विविध प्राधिकरणांसोबत आयोजित शहर आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीप्रसंगी समितीचे अध्यक्ष म्हणून आयुक्तांनी मिराभाईंदर शहरातील सर्व प्राधिकरणांनी परस्पर समन्वय राखून नियोजन करावे व त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी करावी असे सूचित केले.
सध्या सुरू असलेल्या स्थापत्य विषयक कामांची स्थिती जाणून घेत ही कामे २४४७ तास सुरू ठेवून जलद गतीने व कामाची गुणवत्ता राखून कामे पूर्ण करावीत असे निर्देशित केले. रस्ते खड्डेमुक्त राहावेत याकडे काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश देतानाच कुठल्याही परिस्थितीत रस्त्यावर खड्डा चालणार नाही याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश आयुक्त यांनी दिले.
मॅनहोल कव्हर व गटारांची साफसफाई करून त्यांच्यावरील तुटलेली झाकणे ही तातडीने बदलून घेण्याचे निर्देश दिले. गटार किंवा नाल्या शेजारील रस्त्यावरील डेब्रिज उचलणे व पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याकरिता तात्पुरत्या स्वरूपात बांधलेले गटारे साफ ठेवण्याचे निर्देशित करण्यात आले. शहरातील बांधकामे सुरू असलेल्या इमारतींची माहिती व इमारतीच्या चहूबाजूंनी सुरक्षेच्या दृष्टीने जाळ्या व इतर अपघात प्रतिबंधक उपाययोजना करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. रस्त्यावरील दिवाबत्ती सुव्यवस्थित राहील व विद्युत खांबामुळे कोणतीही दुर्घटना घडणार नाही याची खबरदारी घ्यावी. याकरिता प्रत्येक विद्युत खांबाची काळजीपूर्वक पाहणी करावी असे निर्देश देण्यात आले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600