जिल्हा
प्रिय देवाभाऊ... १८ वर्षांपर्यंत मोफत शिक्षण द्या
प्रिय देवाभाऊ... १८ वर्षांपर्यंत मोफत शिक्षण द्या
फोटो: ठाणे वैभव
शहापुरातील आठ हजार विद्यार्थ्यांची मुख्यमंत्र्यांना पोस्टकार्डातून साद
शहापूर: महाराष्ट्रातील प्रत्येक बालकाला ३ ते १८ वर्षांपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण मिळावे या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेने राज्यभर सुरू केलेल्या 'शिक्षण हक्क' अभियानाला शहापूर तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अभियानाच्या पहिल्याच दिवशी तालुक्यातील सुमारे आठ हजार विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोस्टकार्ड लिहून शिक्षणाचा हक्क १८ वर्षांपर्यंत कायदेशीर करण्याची मागणी केली.
श्रमजीवी संघटनेच्या संस्थापिका विद्युलता पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त या राज्यव्यापी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. विद्यार्थ्यांनी पोस्टकार्डवर "प्रिय देवाभाऊ, महाराष्ट्रातील प्रत्येक मुलाला १८ वर्षांपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण तुम्हीच देऊ शकता," असे भावनिक आवाहन करत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० आणि नीती आयोगाच्या शिफारशींचा आधार घेत महाराष्ट्रात १८ वर्षांपर्यंतच्या सर्व मुलांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी अशी प्रमुख मागणी अभियानातून करण्यात आली आहे.
सध्या कायद्यानुसार ६ ते १४ वर्षांपर्यंतच्या मुलांनाच मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार आहे. बदलत्या शैक्षणिक गरजा लक्षात घेता ही मर्यादा १८ वर्षांपर्यंत वाढविणे आवश्यक असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात पोस्टकार्ड लिहून ती संबंधित पोस्ट कार्यालयांमधील टपालपेट्यांमध्ये टाकली. साकडबाव येथील पोस्ट कार्यालयात झालेल्या मुख्य कार्यक्रमाला श्रमजीवी संघटना महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष बाळाराम भोईर, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण चौधरी, कार्यालय सचिव कमलाकर शिंदे, तालुका संघटक कैलास मुकणे, गटाध्यक्ष नकुल विशे आणि गणाध्यक्ष संतोष गिरा उपस्थित होते. याशिवाय शहापूर, पिवळी, खर्डी, आटगाव, किन्हवली, वासिंद, खातिवली, कसारा, वाशाळा, शिरोळ, अघई आणि तानसा येथील पोस्ट कार्यालयांमध्येही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत अभियानात सक्रिय सहभाग नोंदविला.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600