जिल्हा

दिल्ली-मुंबई फ्रेट कॉरिडॉर घेणार घोडबंदर मार्गाचा भार

दिल्ली-मुंबई फ्रेट कॉरिडॉर घेणार घोडबंदर मार्गाचा भार
दिल्ली-मुंबई फ्रेट कॉरिडॉर घेणार घोडबंदर मार्गाचा भार फोटो: ठाणे वैभव
* नवीन वर्षात घोडबंदर मार्ग होणार कोंडीमुक्त * खासदार नरेश म्हस्के यांनी घेतला आढावा ठाणे: घोडबंदर रोड हा सर्व राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. मार्च २०२६मध्ये दिल्ली-मुंबई फ्रेट कॉरिडॉर हा मार्ग सुरू झाल्यावर जवाहरलाल नेहरू बंदरातून होणारी बहुतांश कंटेनर वाहतूक या मार्गावर जाईल. त्यामुळे घोडबंदर रस्त्यावरील अवजड वाहनांचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी होईल, अशी माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली. घोडबंदर रोड आणि परिसरातील विविध समस्या आणि प्रलंबित विषयांचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी खासदार नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दिल्ली-मुंबई फ्रेट कॉरिडॉरचे काम मार्चपर्य़ंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे कंटेनरचा ३० ते ३५ टक्के भार त्या मार्गावर जाणार आहे. तसेच, खानिवडे ते आमणे येथील मिसिंग लिंक जोडल्यास घोडबंदर रोडवरील आणखी भार कमी होणार आहे. त्यासाठी महापालिका राष्ट्रीय महामार्ग प्राधिकऱणाकडे पाठपुरावा करीत आहे. हा विषय जलद मार्गी लागावा यासाठी ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे लवकरच बैठक आयोजित करण्याच्या सूचनाही या बैठकीत खासदार म्हस्के यांनी दिल्या. घोडबंडर रोड आणि इतर रस्त्याचा स्वीकार करण्यास महापालिका तयार आहे. मात्र, हस्तांतरणापूर्वी, सध्या या रस्त्याचा ताबा ज्या यंत्रणांकडे आहे, त्यांनी ते रस्ते सुस्थित आणून ठेवावेत. मगच महापालिका त्यांचा ताबा घेईल, असे या बैठकीत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले. घोडबंदर मार्गावरील खड्डे, पॅचवर्कचे उंचवटे यामुळे अपघात होत आहेत. उड्डाणपुलावरील रस्त्याची स्थिती चांगली नाही. त्यावर तत्काळ उपाय करण्याचे निर्देश खासदार म्हस्के यांनी या बैठकीत दिले. एमएमआरडीए आणि सार्वजनिक बांधकाम विभागांनी ही दुरुस्तीची कामे १० डिसेंबरपर्यंत पूर्ण करावीत, असेही त्यांनी सांगितले. वाहतूक, रिक्षा आदींबाबत काहीही तक्रारी असतील तर त्या नागरिकांनी महाट्राफिक या पोलीसांच्या ॲपवर नोंदवाव्यात, असे आवाहन यावेळी पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट यांनी केले. या बैठकीत, जस्टिस फॉर घोडबंदर रोड या संस्थेच्या प्रतिनिधींनी तसेच परिसरातील नागरिकांनी घोडबंदर परिसरातील अंतर्गत रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, वाहतूक कोंडी आदींबाबत विविध समस्या आणि सूचना मांडल्या. माजी नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर यांनी साकेत ते गायमुख या कोस्टल रोडचा गायुमख ते फाऊंटन-वर्सोवा इथपर्यंत विस्तार करण्याची सूचना मांडली. तसेच, ओवळा-मोघरपाडा हा अंतर्गत रस्ता विकसित केल्यास त्याचा परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. महापालिका मुख्यालय येथील कै. अरविंद पेंडसे सभागृह येथे झालेल्या या बैठकीस महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट, प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, माजी नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर यांच्यासह ठाणे महापालिका, मेट्रो, एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, प्रादेशिक परिवहन विभाग यांचे अधिकारी, जस्टिस फॉर घोडबंदर रोड या संस्थेचे प्रतिनिधी, घोडबंदर रोड परिससरातील गृहसंकुलांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. खासदार आणि आयुक्त अधिकाऱ्यांवर भडकले घोडबंदर महामार्गावर पडलेले खड्डे आणि पॅचवर्कमुळे रस्त्यांची झालेली खराब अवस्था यामुळे वाहतूक कोंडी बरोबरच अपघात देखील वाढले आहेत. या मुद्द्यावरून खासदार नरेश म्हस्के यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. रस्ते दुरुस्तीची कामे केव्हा सुरु करणार याची तारीख कळवा आणि दिलेल्या तारखेला जर काम सुरु झाले नाही तर तुम्हाला कार्यालयात बसू देणार नाही अशी तंबीच म्हस्के यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे. दुसरीकडे आयुक्तही पीडब्ल्युडी अधिकाऱ्यांवर घसरले. पीडब्ल्युडीच्या अखत्यारीत असलेले खड्डेयुक्त रस्ते जसेच्या तसे महापालिकेकडे वर्ग करण्यासाठी ठाणे महापालिकेकडे काही जादूची कांडी नाही. किमान आवश्यक दुरुस्ती तरी करा, आम्ही ते रस्ते घ्यायला तयार आहोत, या शब्दात आयुक्त सौरभ राव यांनी अधिकाऱ्यांना ठणकावले.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600